Menu Close

परळी वैजनाथ येथे श्री वैजनाथाच्या अभिषेकासाठी भाविकांना बाटलीबंद पाणी आणण्याचा पुजार्‍यांकडून आग्रह

  • भाविकांतून तीव्र अप्रसन्नता 
  • दूषित पाणीपुरवठ्यामुळे शिवपिंडीची झीज होत असल्याचा दावा

अभिषेकासाठी बाटलीबंद पाणी आणण्याचा आग्रह भक्तांकडे करण्याऐवजी मंदिर संस्थानने भाविकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. भाविकांवर बाटलीबंद पाण्याचा खर्चिक पर्याय लादणे कितपत योग्य ? भाविक श्रद्धेने धन अर्पण करत असतात. त्यामुळे देवस्थान संस्थानाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा पुरवल्या पाहिजेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संभाजीनगर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैजनाथाला अभिषेक करायचा असेल, तर त्यासाठी पिंडीवर बाटलीबंद पाणी आणण्याचाच आग्रह भक्तांकडे केला जात आहे. यामुळे भाविकांमधून मंदिर संस्थानविषयी अप्रसन्नता व्यक्त केली जात आहे. परळीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ते पाणी पिंडीसाठी वापरल्यानंतर पिंडीची झीज होत आहे. या कारणास्तव काही पुजार्‍यांनी पिंडीच्या अभिषेकासाठी बाटलीबंद शुद्ध पाणी वापरण्याची सूचना केली आहे.

१. परळीत अजूनही जलस्रोतांमध्ये पाणी साठेल, असा पाऊस झालेला नाही. सध्या चांदापूर धरणातून पाणीपुरवठा होतो.

२. संपूर्ण मंदिर परिसरासाठी ४० सहस्र लिटर पाणी लागते. त्यामध्ये स्वच्छता आदी कामे केली जातात; मात्र मागील काही मासांपासून मंदिर परिसरातील नळाला येणारे पाणी दूषित आहे.

३. त्यात अलीकडेच श्री वैजनाथाच्या पिंडीवरील चांदीचे कवचही काढण्यात आले आहे. त्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यामागे भक्तांना थेट पिंडीचे दर्शन घेता यावे, ही मागणी असल्याचे सांगण्यात आले होते.

४. चांदीचे कवच काढल्यापासून थेट पिंडीवर अभिषेक करण्यात येत होता; मात्र अभिषेकासाठी वापरण्यात येणारे पाणी हे दूषित असून त्यामुळे पिंडीची झीज होत असल्याचे मत काही पुजार्‍यांनी मंदिर संस्थानकडे मांडले.

५. त्यामुळे मंदिर संस्थाननेच शुद्ध पाण्याचा वापर अभिषेकासाठी करावा, असा निर्णय घेतला. संस्थानकडून मंदिर परिसरात पाणी शुद्ध करणारे यंत्रही बसवण्यात आलेले आहे; मात्र त्याऐवजी भक्तांना थेट बाटलीबंद पाण्याचा आग्रहच केला जात आहे, असा तक्रारीचा सूर ऐकायला मिळत आहे. (यंत्र बसवूनही संस्थान त्याचे पाणी पिंडीसाठी का वापरत नाही ? कि ते अशुद्ध आहे असे संस्थानला वाटते ? यावर उपाययोजना का काढण्यात येत नाही ? सरकारीकरण झालेल्या मंदिरांत भाविकांच्या तक्रारी असणे नित्याचे झाले आहे. त्यामुळे मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! हिंदु राष्ट्रात मंदिरांचा कारभार भक्तांकडे सोपवण्यात येईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) 

वैजनाथ मंदिर देवस्थान संस्थानने भक्तांच्या सोयीसाठी पाणी शुद्ध करण्याचे यंत्र (आर्ओ) बसवलेले आहे. त्याचेही पाणी अभिषेकासाठी वापरले जाते. – विपीन पाटील, तहसीलदार तथा अध्यक्ष, वैजनाथ मंदिर संस्थान.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *