नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासकीय अधिकार्यांना निवेदने सादर
सावंतवाडी : भारतीय संस्कृतीचे जतन करणे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणे हा प्रामुख्याने सण, उत्सव यांमागील उद्देश असतो; सध्या मात्र या उत्सवांमध्ये अपप्रकारांनी शिरकाव केला आहे. अशाच प्रकारे सार्वजनिक नवरात्रोत्सवातही चित्रपट गीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्लील अंगविक्षेप करत नाचणे, बलपूर्वक वर्गणी गोळा करणे, मंडपात जुगार खेळणे आदी प्रकारांमध्ये वाढ होत आहे. परिणामी या उत्सवाच्या काळात अनैतिक कृत्यांमध्ये वाढ झाली आहे. देशात काही ठिकाणी नवरात्रोत्सवानंतर गर्भपाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याची वृत्ते अनेक दैनिकांत प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे उत्सवाचे पावित्र्यही नष्ट होत आहे. यांमुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची अपरिमित हानी होत आहे. ही हानी टाळून सण, उत्सव यांसह आगामी नवरात्रोत्सवाचे पावित्र्य राखले जावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने जिल्ह्यात कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी येथील पोलीस ठाण्यांमध्ये आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये अधिकार्यांना निवेदने सादर केली आहेत.
निवेदन स्वीकारल्यावर कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी सांगितले, ‘‘मध्यंतरीच्या काळात हिंदूंमध्ये धर्माविषयी जागृती आणि प्रबोधन करण्यासाठी कोणते प्रयत्न झाले नाहीत. तुम्ही हे जागृती आणि प्रबोधनाचे काम करत आहात, हे स्तुत्य आहे. नवरात्रीमध्ये होणारे अपप्रकार रोखणे आवश्यक आहे. यासाठी आम्हीही आवश्यक ते प्रयत्न करू.’’