शनिशिंगणापूर : नगर जिल्ह्यामधील श्रीरामपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भानुदास मुरकुटे हे काल दुपारी २ वाजता त्यांच्या काही महिला कार्यकर्त्यांसमवेत श्री शनिमंदिरात दर्शनासाठी आले होते. या वेळी ते चौथर्याजवळ गेले आणि त्यांनी ‘महिला कार्यकर्त्यांना चौथर्यावर जाऊन दर्शन घेऊ द्या’, असा आग्रह करत अरेरावी केली.
तेव्हा स्थानिक सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. त्या वेळी मुरकुटे यांनी एका सुरक्षारक्षकाचा गळा धरला आणि त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर तेथील सुरक्षारक्षक, पोलीस आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे मुरकुटे अन् महिला कार्यकर्त्या यांना मंदिराबाहेर हाकलले.
त्यानंतर काही वेळाने मुरकुटे हे ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत पुन्हा चौथर्याजवळ आले. त्या वेळी मुरकुटे यांनी पोलीस आणि सुरक्षारक्षक यांना धक्काबुक्की केली. तेव्हा पोलीस, सुरक्षारक्षक आणि ग्रामस्थ यांनी पुन्हा मुरकुटे यांना मंदिराबाहेर काढले. त्यानंतर ग्रामस्थांनी मुरकुटे यांना चोप दिला.
शेवटी तृप्ती देसाई यांच्या समवेत मुरकुटे यांनी तिसर्यांदा चौथर्यावर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांना अज्ञातस्थळी हलवले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात