कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीत देवीला हतबल दाखवले
धर्मशास्त्राचा अभ्यास नसल्यामुळे दैवी शक्तीची मानसिक पातळीवर कल्पना करणारे हिंदू !
मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक प्रसिद्धीमाध्यावर (सोशल मिडियावर) श्री अंबाबाईच्या रूपातील स्वत:चे छायाचित्र ‘पोस्ट’ केले आहे. या छायाचित्रासमवेत पोस्ट करण्यात आलेल्या संदेशामध्ये देवीला निसर्गरूपात लेखांकित केले आहे. यात देवी ‘वृक्षतोड, उंच इमारती, होर्डिंग यांमुळे भाविकांचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याचे सांगत आहे’, असे दाखवले आहे. (ज्याप्रमाणे सूक्ष्म अणूपासून निर्माण झालेल्या अणूबॉम्ब जगाचा विनाश करू शकतो, त्याप्रमाणे उच्च देवतांची शक्तीही असीमित असते. प्रत्येक व्यक्तीचे प्रारब्ध-संचित यांनुसार तिला जीवनातील प्रसंगांना सामोरे जावे लागते, हे आपले धर्मशास्त्र सांगते. जो धर्मपालन करतो, त्याचे रक्षण देवता करतात; मात्र हिंदू साधना करत नसल्यामुळे देवतांकडे मानसिक स्तरावर पाहिले जाते. यावर ‘हिंदूंना धर्मशिक्षण देणे’, हाच एकमेव उपाय आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या संदेशामध्ये लिहिले आहे, ‘याच उघड्या डोळ्यांनी विनाशाचे तांडव पहात होते मी… माझ्यासमोर जोडले जाणारे अनेक हात वाहत जातांना पहात होते मी… पण मी अवतरणार तरी कशी ? सावरणारे माझे हात टप्प्याटप्प्याने छाटलेस तू…कधी मोठ्या रस्त्यांसाठी, कधी साखर कारखान्यांसाठी, तर कधी उंच इमारतींसाठी. ज्या किरणांनी माझं तेज प्रदीप्तीत व्हायचं, त्याच्या मार्गातच तुझ्या स्वार्थाने होर्डिंग्ज लावलेस. मत्स्येंद्री ने फुलणारा माझा रंकाळा जलपर्णींनी जखडून टाकलास तू…म्हणून सावरू शकले नाही तुला… पण शेवटी मी आई आहे. कठोर झाले, तरी साथ नाही सोडणार… मी बहरायचे नाही सोडणार, मी बहरायचे नाही सोडणार.’ अभिनेत्रीने ‘महिलांवर अत्याचारही होत असतात’, अशा आशयाचे ट्वीटही केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात