जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु धर्मसेनेच्या वतीने हिंदु धर्मसभा !
जबलपूर (मध्यप्रदेश) : देशविरोधी घटक ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देऊन हिंदूंच्या भावनांशी खेळत आहेत. अशा एक ना अनेक समस्या हिंदूंच्या समोर आहेत. अहिंदूंची वाढती लोकसंख्या हाही चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आता हिंदूंनी केवळ आणि केवळ हिंदु राष्ट्राची मागणी करावी, असे प्रतिपादन विश्व सनातन संघाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. उपदेश राणा यांनी केले. ते जबलपूर येथे हिंदु धर्मसेना या संघटनेच्या वतीने आयोजित हिंदु धर्मसभेला संबोधित करत होते. या वेळी व्यासपिठावर संत दादा पगलानंद, साध्वी शिरोमणी, अखिल भारतीय संत समिती मध्यप्रदेशचे रामराजाचार्यजी महाराज, हिंदु धर्मसेनेचे प्रदेश अध्यक्ष श्री. योगेश अग्रवाल उपस्थित होते.
साध्वी शिरोमणी म्हणाल्या की, आज धर्मासाठी बोलण्याचा नाही, तर वेळ देण्याचा काळ आहे. अनेक युवक आज त्यागाच्या भावनेने हे कार्य करत आहेत, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. प्रत्येकाने थोडा त्याग केला, तरी भारताला त्याचे पुनर्वैभव प्राप्त होईल. श्री. योगेश अग्रवाल यांनी अखंड भारत कसा खंडित होत गेला, याची माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले, ‘हिंदूंच्या घटत्या जनसंख्येकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. अहिंदूंच्या जनसंख्या नियंत्रणासाठी संघटित होऊन प्रयत्न करायला हवे’, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करा ! – आनंद जाखोटिया
आपली भाषा, धर्मग्रंथ, संत, मंदिर, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. प्रथम हिंदूंना धर्माचरण करून स्वतःपासून हिंदु राष्ट्राचा प्रारंभ करावा लागेल. त्याचसमवेत राष्ट्रीय जीवनात धर्म प्रतिष्ठापित व्हावा, यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करावी लागेल. इस्रायलने त्याची भाषा, सण, परंपरा यांना राजाश्रय देऊन स्वतःला ज्यू राष्ट्र घोषित केले. भारताने त्याच्याकडून बोध घ्यायला हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी केले.