मुंबई : होईल म्हणजे, पाऊस पडेल काय ? झाडाला फळ लागेल काय ? अमुक होईल काय ? असे नाही. राम मंदिर होईल नाही, होणारच, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले. ६ ऑक्टोबरला दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या वेळी श्री. उद्धव ठाकरे म्हणाले,
१. लोकसभेत जिंकल्यानंतर मी पुन्हा अयोध्येत गेलो. याचा अर्थ निवडणुकीनंतरही हा विषय आम्ही लावून धरला आहे. आजही हा विषय आमच्या ‘अजेंड्या’वर आहेच. माननीय पंतप्रधान म्हणाले, ‘थोडे थांबा’, मग थोडे थांबू. बघू काय होते ते ?’
२. आम्ही अयोध्येत जाऊन आल्यानंतर देशभरात वादळ उठले. सगळ्यांना तो विषय ऐरणीवर घ्यावा लागला. न्यायालयालासुद्धा सुनावणी घ्यावी लागली. दीड मासात त्याचा निकाल अपेक्षित आहे.
३. शिवसेना आणि भाजप हे एका विचारधारेचे पक्ष आहेत. वर्ष १९८७ मध्ये पार्ले (मुंबई) येथील पोटनिवडणुकीने हिंदुत्वाचे महत्त्व दाखवून दिले. हिंदुत्व हा विचार देशासाठी किती आवश्यक आहे आणि हिंदुत्व हा विचार निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकतो.
४. भाजपशी युती एका निर्धाराने केली आहे. मागील ५ वर्षांत चिंतन झाले आहे. युती असली तर काय होऊ शकते आणि नसली तर काय होऊ शकते ? याचा अनुभव दोन्ही पक्षांना आणि महाराष्ट्राने घेतलेला आहे. तुम्ही देशाचा विचार करून पहा. उत्तर प्रदेशात सपा-बसपा युती लोकांनी स्वीकारलेली नाही; मात्र महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीला स्वीकारले. महाराष्ट्राचा धृतराष्ट्र झालेला नाही. महाराष्ट्र हा महाराष्ट्रच आहे. तो उघड्या डोळ्यांनी जे घडतेय ते बघतोय. कोण कसे वागतोय, कोण स्वार्थ साधतोय, कोण महाराष्ट्राचा विचार करतोय, हे सर्व तो बघतोय.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात