नागाव (तालुका हातकणंगले) : छत्रपती शिवाजी महाराज हे कुलदेवीचे नि:स्सीम भक्त होते, तसेच त्यांच्या जिवाला जीव देणारे मावळे त्यांच्या समवेत होते. त्या बळावरच छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तोच आदर्श समोर ठेवून हिंदूंनी जात, संप्रदाय, पक्ष यांत न अडकता हिंदू म्हणून धर्मासाठी कार्य करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी केले. ते ८ ऑक्टोबर या दिवशी श्री खणाईदेवी मंदिर येथे दौडीच्या समारोप्रसंगी बोलत होते. या वेळी ५०० हून अधिक श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. किरण दुसे दौडीत पूर्णवेळ सहभागी होते.
प्रारंभी सकाळी ७ वाजता नागाव येथील ग्रामदैवत श्री खणाईदेवी मंदिर येथे ध्वजपूजन करून श्री दुर्गामाता दौडीचा प्रारंभ करण्यात आला. ही दौड गावातील विविध मार्गांवरून जाऊन दौडीचा समारोप श्री खणाईदेवी मंदिर येथे झाला. दौड विविध मार्गांवरून जात असतांना ठिकठिकाणी दौडीचे पूजन करण्यात आले. दुर्गामाता दौडचे नियोजन करण्यात सर्वश्री विजय पाटील, शुभम परिट, रमेश सावंत, किशोर शिंगे, तुषार पोवार, योगेश हराळे यांसह अन्य कार्यकर्त्यांचा पुढाकार होता. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य श्री. उत्तम सावंत, सरपंच श्री. अरुण माळी, पोलीस पाटील बाबासो पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. आशानंद मिठारी, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे उपस्थित होत्या.
विशेष
१. नागाव येथे वर्ष १९९५ पासून गेली २४ वर्षे दौडीचे आयोजन करण्यात येत आहे.
२. श्री दुर्गामाता दौडीत लहान मुले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, शिवछत्रपतींचे मावळे, तसेच पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.