मुंबई : हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याला सदैव पाठिंबा देणार्या, धर्मकार्यात सहभागी होणार्या आणि धर्मकार्यासाठी यथाशक्ती सहकार्य करणार्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची भेट घेऊन समितीच्या वतीने त्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये मुंबई आणि नवी मुंबई येथील अधिवक्ते, वृत्तपत्रांचे संपादक, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, हितचिंतक यांची भेट घेण्यात आली.
शिवसेनेचे भांडुप येथील आमदार श्री. अजय चौधरी, आमदार सौ. तृप्ती सावंत, व्यावसायिक श्री. बिपीन कुलकर्णी, करीरोड सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे (जपाची देवी) प्रमुख कार्यवाह आणि शिवसैनिक श्री. नाना फाटक, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष श्री. संजय सावंत, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे उपमानद सचिव श्री. चारुदत्त लाड, शिवसेनेचे शाखाप्रमुख कांबळी, बैंगणपाडा नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. कानजी दामा, मनोहर डेकोरेटरचे मालक श्री. श्रीधर जाधव, यांसह विविध भागांतील धर्मप्रेमींची प्रत्यक्ष भेट घेऊन समितीच्या कार्यकर्त्यांनी दसर्याच्या शुभेच्छा दिल्या.
तुम्ही करत असलेले धर्मप्रचाराचे कार्य आम्हाला लाजवणारे ! – राजन कांदेकर, अध्यक्ष, क्वारीरोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
तुम्ही करत असलेले धर्मप्रसाराचे कार्य आम्हाला लाजवणारे आहे. तुम्ही यासाठी जे परिश्रम घेता, त्याविषयी तुमचे कौतुक करावे तेवढे अल्पच आहे. धर्म हा सर्वोच्च असूनही हिंदूंची स्थिती अत्यंत विदारक आहे.
दादर येथे राणे समाजाच्या वतीने विजयादशमीचा कार्यक्रम
दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील बुरोंडी गावातील राणे समाजाच्या वतीने दादर येथील देवराज सभागृहात दसरा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर संमेलनाध्यक्ष म्हणून चंद्रकांत राणे उपस्थित होते. तसेच राणे समाजाचे उपाध्यक्ष संतोष राणे, ज्येष्ठ सभासद मनोहर राणे, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता वैद्य उदय धुरी उपस्थित होते. या वेळी वैद्य धुरी यांनी ‘श्री दुर्गादेवी एक श्रद्धास्थान आणि आधुनिक शिक्षण’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी ८० जण उपस्थित होते. या वेळी संमेलनाध्यक्ष श्री. चंद्रकांत राणे, उपाध्यक्ष श्री. संतोष राणे यांसह राणे समाज उपस्थित होता.
राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आवश्यक ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
हिंदू भारतदेशाला मातेच्या स्वरूपात पहातात आणि तिच्या रक्षणासाठी सदैव सिद्ध असतात. या भूमीतील क्रांतीकारकांनी भारतमातेसाठी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतमातेला ‘स्वातंत्र्यलक्ष्मी’च्या रूपाने गौरवले आहे. आज काळानुसार राष्ट्र आणि धर्म यांचे आपल्या क्षमतेनुसार रक्षण करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन वैद्य उदय धुरी यांनी केले.
या वेळी वैद्य उदय धुरी यांनी उपस्थितांना कुलदेवीच्या नामजपाचे महत्त्वही सांगितले. या वेळी संमेलनाध्यक्ष चंद्रकांत राणे यांनी गावातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविषयीची ऐतिहासिक माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण राणे, तर आभारप्रदर्शन रितेश राणे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री दुर्गादेवीच्या आरतीने झाली. या वेळी सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.