सोलापूर : प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीनिमित्त पार्क चौक येथील शमीवृक्षाजवळ सीमोल्लंघनासाठी जमलेल्या हिंदूंना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. समितीच्या वतीने चार हुतात्मा चौक येथे कक्ष लावण्यात आला होता. या वेळी हिंदूंना टिळा लावून, आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भवानीमातेला प्रार्थना करण्याचे अन् राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वेळ देण्याचे आवाहनही करण्यात आले. सर्वांनी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘आई राजा उदेउदे’ अशा घोषणा दिल्या. येथे सीमोल्लंघनासाठी अनेक हिंदू महिला आणि पुरुष, नवरात्रोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, आबालवृद्ध मोठ्या संख्येने जमतात. अनेक नवरात्रोत्सव मंडळांच्या मिरवणुका येथे येतात. काही मानाच्या पालख्या, तसेच काठ्याही असतात. या कक्षाला शहरातील अनेक मान्यवर, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी, नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांनी भेटी दिल्या. या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी समितीचे सर्वश्री आप्पा शहापूरकर, प्रवीण नराल, आकाश श्रीराम, अंबादास कडगुल्ला यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्र : अनेक हिंदू ‘हिंदु जनजागृती समिती’च्या फलकासमोर उभे राहून उत्स्फूर्तपणे ‘सेल्फी’ काढत होते.