धुळे येथे दसर्यानिमित्त ‘धर्म विजय सोहळा’
धुळे : विजयादशमी म्हणजे ‘विजय’ मिळाल्याचा आनंद साजरा करण्याचा दिवस ! या दिवशी रावणदहन करतात. आपण सर्वांनी स्वतःतील दुर्गुण, वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचा दिवस म्हणजे ‘विजयादशमी’. आपले स्वतःचे आचरण प्रभु श्रीरामाप्रमाणे आदर्श असायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. येथील जय मल्हार मित्र मंडळ आणि जनभूमी फाऊंडेशन यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही विजयादशमीनिमित्त ‘धर्म विजय सोहळा आणि रावणदहना’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्यास सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सदगुरु नंदकुमार जाधव, भागवताचार्य राजीवकृष्णजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
सनातनचे साधक श्री. सागर म्हात्रे यांनी केलेल्या शंखनादाने सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय संत इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज आणि भागवताचार्य राजीवकृष्णजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी श्री. शिंदे म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद हे हिंदूंवरील मोठे धर्मसंकट आहे. त्याचे भयावह दुष्परिणाम रोखण्यासाठी हिंदु मुलींना धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. काही धर्मांध ‘योग दिना’स विरोध करतात. सूर्य हिंदूंचे दैवत आहे; म्हणून सूर्यनमस्कारास विरोध करतात, तर अशांनी सूर्यप्रकाशही वापरू नये. ‘पवनपुत्र हनुमान’ यातील ‘पवन’ म्हणजे ‘वायू’ हे हिंदूंचे दैवत आहे. मग त्यांनी वायूचाही वापर करू नये.’’