नागपूर : नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरात ठिकठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. नवरात्रीत नऊ दिवस करायच्या व्रताचे महत्त्व, धार्मिक कृती, नवरात्रीत गरब्याच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखणे, धर्मांतर, लव्ह जिहादसारख्या संकटापासून रक्षण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. श्री रेणुका मंदिर, यशोदा नगर, हिंगणा रोड येथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. अनेक जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. प्रवचन चालू असतांना एक कुटुंब दुरून विषय ऐकत होते. प्रवचनानंतर त्यांनी स्वतःहून संपर्क करून ‘आमचे मोठे कुटुंब आहे. तिथेही तुम्ही प्रवचन घ्या’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.
२. श्री दुर्गाशक्ती उत्सव मंडळात मंडपाच्या आत कोणालाही फलक लावण्याची अनुमती नसतांना विश्वस्तांनी समितीला धर्मशिक्षण देणारे फलक प्रदर्शन लावण्याची अनुमती दिली.