हिंदु जनजागृती समितीचे आयोजन
थिरुवन्नमलाई (तमिळनाडू) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पर्वतराजा कुलसंगा सभागृहामध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक शिबिरामध्ये धर्मप्रेमी युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या शिबिराला सनातनच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांची वंदनीय उपस्थिती होती. या शिबिरासाठी शिवसेनेचे तमिळनाडू राज्य अध्यक्ष श्री. जी. राधाकृष्णन् यांनी साहाय्य केले.
पू. (सौ.) रविचंद्रन् यांनी ‘सात्त्विक राहणीमान; रांगोळी काढण्यामागील अध्यात्मशास्त्र; वास्तुशुद्धी का करावी ? नमस्कार करण्यामागील शास्त्र’ आदी विषयांवर शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले. समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व, तसेच प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त का करावी ?’ यांविषयी माहिती दिली.
सौ. कल्पना बालाजी यांनी सण-उत्सव यांमागील शास्त्राविषयी मार्गदर्शन करतांना दिवाळी, श्री गणेशचतुर्थी, नवीन वर्ष, ‘वाढदिवस शास्त्रानुसार कसा साजरा करावा ?’ आदींविषयी माहिती दिली. यासमवेतच पाश्चात्त्य पद्धतीनुसार साजरे करण्यात येत असलेल्या विविध ‘डे’ची निरर्थकताही स्पष्ट केली. या वेळी सौ. बालाजी यांनी देवतांची चित्रे असलेले, तसेच ॐ, स्वस्तिक आदी सात्त्विक चिन्हे असलेले पोशाख परिधान का करू नयेत ?, यांविषयी सांगितले.
क्षणचित्रे
१. शिबिरार्थींकडून कुलदेवता आणि श्री दत्त यांचा सामूहिक नामजप करून घेण्यात आला.
२. शिबिरात शिबिरार्थींचे शंकानिरसन करण्यात आले.
३. सौ. जयकुमार यांनी ईश्वरी राज्याची संकल्पना स्पष्ट केली आणि ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
४. शिबिरार्थींना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया कशी राबवायची, याविषयी माहिती देण्यात आली.