पुच्चक्कल (केरळ) येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्तीकडून भागवत सप्ताहाचे उद्घाटन
पुच्चक्कल, अलापुझा (केरळ) : येथील ‘वेलीयीळ श्री भद्रकाली मंदिरा’मध्ये नुकताच भागवत सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे उद्घाटन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रणिता प्रसाद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. हा सप्ताह प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाला मंदिराचे अध्यक्ष, तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. या वेळी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी कु. प्रसाद म्हणाल्या, ‘‘हिंदूंना धर्मशिक्षण न मिळाल्यामुळे त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने साधना आणि धर्माचरण केले पाहिजे.’’
कोची येथे ‘दैनंदिन जीवनात धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन
कोची (केरळ) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे ‘दैनंदिन जीवनात धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीच्या कु. रश्मी परमेश्वरन् यांनी ‘साधना आणि धर्माचरण’ यांचे महत्त्व सांगितले. ‘हिंदु संस्कृती आणि परंपरा यांचे रक्षण करणे, हे आपले दायित्व आहे’, असेही त्यांनी सांगितले.
कडवंथरा येथे ‘नवरात्रीचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन
एर्नाकुलम् (केरळ) : कडवंथरा येथील श्री सुब्रह्मण्य मंदिरात आयोजित नवरात्रोत्सवामध्ये हिंदु जनजागृती समितीला ‘नवरात्रीचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी समितीचे श्री. बालकृष्ण यांनी ‘नवरात्र आणि विजयादशमी’ यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी अनेकांनी शंकांचे निरसन करून घेतले, तसेच काहींनी आठवडा सत्संग घेण्याची मागणी केली. या मार्गदर्शनाचा लाभ ४० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.