Menu Close

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सांगलीच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना सुरक्षा देण्यात यावी, तसेच गोरक्षणाचे कार्य करणार्‍यांना कायदेशीर संरक्षण मिळावे ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी

सांगली : देशात गेल्या काही दिवसांत हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे कायकर्ते, पदाधिकारी यांच्यावर प्राणघातक आक्रमण अन् त्यांची हत्या होण्याचे प्रमाण वाढत आहे. १८ ऑक्टोबर या दिवशी हिंदू महासभेचे कमलेश तिवारी यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. याचसमवेत गेल्या काही मासांमध्ये हरियाणासह अन्य राज्यांत गोरक्षकांवरही प्राणघातक आक्रमणे होत आहेत. श्रीराम मंदिर होणार हे निश्‍चित असल्याने यात बाधा आणण्याचा काही समाजकंटकांकडून हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या घडवून लक्ष विचलीत करण्याचा डाव आहे. तरी असे समाजकार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना सुरक्षा देण्यात यावी, तसेच गोरक्षक आणि गोरक्षणाचे कार्य करणार्‍यांनाही कायदेशीर संरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना १९ ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.

या वेळी गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्थेचे श्री. अंकुश गोडसे, वेद खिल्लार गोशाळेचे श्री. नितेश ओझा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह वैद्य मनोज पाटील, शिवसेना शहरप्रमुख श्री. मयुर घोडके, बजरंग दलाचे सांगली गोसवा शहरप्रमुख श्री. धन्यकुमार चौगुले, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. केदार मजती, गायत्री गो-संवर्धन केंद्र, अखिल भारत कृषी गोसेवा संघ, विश्‍व हिंदु परिषद यांचे कार्यकर्ते, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष देसाई, गोरक्षनाथ लिमकर, गुरुदास कुलकर्णी, अविनाश देवळेकर, पुरण मलमे, संजय पाटील, अजिंक्य बागणे, अनिल पारशेट्टी उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की

१. काही दिवसांपूर्वीच पश्‍चिम बंगाल राज्यात प्रकाश पाल, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा ६ वर्षांचा मुलगा यांची हत्या करण्यात आली.

२. हरियाणा येथे बजरंग दलाचे संयोजक मोनू यादव यांच्यावर गोतस्करांनी पोलिसांचे रस्त्यावरील सुरक्षाकवच भेदून प्राणघातक आक्रमण केले. त्यापूर्वी हरियाणा येथे गोरक्षक गोपाल यांच्यावर गोतस्करांनी गोळी घालून त्यांची हत्या केली. सोलापूर येथे एका गोरक्षकावर प्राणघातक आक्रमण करून त्याला ठार मारण्यात आले.

३. पुणे येथे धडाडीचे गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी यांच्यावर पोलीस सुरक्षा असतांना त्यांच्यावर जीवघेणे आक्रमण करण्यात आले.

४. गुजरात राज्यात गेल्या तीन वर्षांत २७ जणांचे हत्याकांड झाले. त्यातील अनेक जण विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्याशी संबंधित होते.

५. एका विशिष्ट अल्पसंख्याक समुदायावर आक्रमण होत असल्याची खोटी वृत्ते विविध प्रसारमाध्यमांमधून पसरवण्यात येतात. एखाद्यास व्यक्तीगत कारणावरून मारहाण झाल्यास ती ‘मॉब लिंचिंग’ म्हणून पुरोगाम्यांकडून ऊर बडवण्यात येतो.

सर्वांना तळमळीने एकत्र करून निवेदन देण्यासाठी पुढाकार घेणारे हिंदुत्वनिष्ठ गोरक्षक अंकुश गोडसे !

१८ ऑक्टोबर या दिवशी हिंदू महासभेचे कमलेश तिवारी यांची भरदिवसा हत्या करण्यात आल्याचे वृत्त समजताच अत्यंत अल्प कालावधीत गोरक्षक श्री. अंकुश गोडसे यांनी निवेदन सिद्ध करण्यापासून ते सर्वांना एकत्र करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी पुढाकार घेतला. धर्मरक्षणासाठी त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *