उत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! केंद्र सरकार आणि प्रत्येक राज्य सरकार यांनी असा निर्णय घेऊन देवभाषा संस्कृतला पुनरुज्जीवित केले पाहिजे !
लक्ष्मणपुरी : उत्तरप्रदेश सरकारकडून संस्कृत भाषा शिकणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. उत्तरप्रदेश संस्कृत संस्थेकडून देण्यात येणार्या शिष्यवृत्तीला सरकारकडून संमती मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना ६ सहस्र रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे.
१. संस्थेचे अध्यक्ष डॉ. वाचस्पति मिश्र म्हणाले की, पूर्वी समाजकल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना केवळ ५०० रुपये शिष्यवृत्ती मिळत होती. त्याचा विशेष लाभ होत नव्हता. राज्यातील १ सहस्र १७५ शैक्षणिक संस्थांमध्ये १ लाख विद्यार्थी शिकत आहेत. त्यांना आता त्यांच्या इयत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाईल. इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना २ सहस्र रुपये, ९ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना ५ सहस्र रुपये, तर ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना ६ सहस्र रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाईल. पहिल्या टप्प्यात १ सहस्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. या शिष्यवृत्तीसाठी ६० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
२. डॉ. मिश्र म्हणाले की, संस्कृत शिकवणार्या विद्यार्थ्यांमध्ये आतूनही संस्कार होतात, जे समाजाला नवी दिशा देणारे असतात. संस्कृत शिकणारे ज्योतिषाचार्य, कर्मकांड करणारे किंवा पुरोहितच बनू शकतात, हे मिथक तोडून संस्कृत नव्या दिशेने वाटचाल करत आहे. संस्कृत शिकूनही नागरी सेवेसमवेत अन्य क्षेत्रांमध्ये बौद्धिक क्षमता दाखवण्यात येऊ शकते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात