लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : हिंदु समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांची हत्या करणारे मारेकरी येथील एका हॉटेलमध्ये एक दिवस राहिले होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी ते राहिलेल्या हॉटेलच्या खोलीची झडती घेतली. त्यात त्यांना हत्येच्या वेळी दोन्ही मारेकर्यांनी घातलेले भगवे सदरे सापडले आहेत. या सदर्यांवर रक्ताचे डाग सापडले आहेत. तसेच या दोघांचे अन्य साहित्य आणि बॅगाही पोलिसांना येथे सापडल्या आहेत.
हे दोघेही मारेकरी १७ ऑक्टोबरला रात्री या हॉटेलमध्ये आले होते. त्यांनी येथे एक खोली घेतली. सकाळी ते लवकर बाहेर गेले आणि साडेदहाच्या सुमारास परत आले. जातांना त्यांनी भगवे सदरे घातले होते. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना मिळाले आहे. त्याद्वारे पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत. गुजरात आतंकवादविरोधी पथक या हत्येच्या प्रकरणी अशफाक आणि मोइनुद्दीन पठान उपाख्य फरीदी यांचा शोध घेत आहे.
कमलेश तिवारी यांच्या कुटुबियांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट
२० ऑक्टोबरला सकाळी कमलेश तिवारी यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यात तिवारी यांच्या आई, पत्नी आणि दोन मुले यांचा समावेश होता. भेटीनंतर कमलेश तिवारी यांच्या पत्नी किरण तिवारी म्हणाल्या, ‘‘योगी आदित्यनाथ यांनी ‘आम्हाला न्याय मिळेल’, असे आश्वासन दिले आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. ‘माझ्या मोठ्या मुलाला सरकारी नोकरी मिळावी’, ‘कुटुंबासाठी लक्ष्मणपुरी येथे घर मिळावे’, ‘तिवारी यांच्या हत्येची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी व्हावी’, ‘कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे, तसेच आर्थिक साहाय्य मिळावे’, अशा मागण्या आम्ही केल्या आहेत.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात