कमलेश तिवारी यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्यांना कठोर शासन करण्याचीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
कोल्हापूर : देशात गेल्या काही दिवसांत हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर प्राणघातक आक्रमण आणि त्यांची हत्या होण्याचे प्रमाण वाढत आहे. काही मासांमध्ये गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमणे होत आहेत. हा व्यापक कटाचा भाग असण्याची शक्यता आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या वाढत्या हत्याकांडामागील षड्यंत्राचा शोध घेण्यात यावा, त्यांना योग्य ती सुरक्षा पुरवावी, कमलेश तिवारी यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्यांना कठोर शासन व्हावे, तसेच गोरक्षकांनाही कायदेशीर सुरक्षा मिळावी, अशा मागणीचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन २३ ऑक्टोबरला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिलेे.
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदू महासभेचे सर्वश्री मारुती मिरजकर, बबन हरणे, संतोष पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. १८ ऑक्टोबर या दिवशी हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. काही आरोपींना अटक करण्यात आली आहे; मात्र यामागे मोठे षड्यंत्र आहे.
२. उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. मुकेश शर्मा यांचीही हत्या करण्यात आली होती.
३. या हत्यांनंतर ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुरेश चव्हाणके, तसेच अन्य काही हिंदुत्वनिष्ठांना सामाजिक संकेतस्थळावर जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.
४. हरियाणात गोतस्करांनी पोलिसांचे सुरक्षाकवच भेदून बजरंग दलाचे संयोजक मोनू यादव यांच्यावर आक्रमण केले. हरियाणात गोपाल या गोरक्षकाची गोतस्करांनी गोळी घालून हत्या केली.
५. पुण्यात गोरक्षक शिवशंकर स्वामी यांच्यावरही पोलीस सुरक्षेत आक्रमण करण्यात आले.