हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या मोहिमेला मिळाले यश !
अमरावती (आंध्रप्रदेश) : विविध हिंदु संघटनांच्या मागणीची नोंद घेऊन आंध्रप्रदेश सरकारने गोरगरीब लोकांसाठी हिंदु मंदिरांच्या भूमीचे वाटप न करण्याचा निर्णय नुकताच घेतला. ‘ग्लोबल हिंदू हेरिटेज फाऊंडेशन’ने सरकारला मंदिरांच्या भूमीचा वापर करू नये, अशी विनंती करणारे एक कडक पत्र लिहिले होते. भाजपसह इतर अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही हीच मागणी केली होती.
आंध्रप्रदेश सरकारने पुढील वर्षी तेलगू नववर्षदिनी ‘युगादि’चा मुहूर्त साधून २५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरांच्या जागा आणि घरे वितरित करण्याचे घोषित केले होते. अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि धार्मिक संघटना यांनी या योजनेला कडाडून विरोध दर्शवला. या पुढे जाऊन हिंदूंनी मंदिरातील भूमी वाटपाच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिकाही उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्याची सिद्धता केली होती.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वाढत्या दबावापुढे सरकारने हिंदूंची बाजू जाणून आधी घेतलेला निर्णय रहित केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात