Menu Close

कुडाळ शहरात श्रीकृष्ण प्रतिमाफेरीद्वारे नरकासुरदहन प्रथेतील अपप्रकारांविषयी प्रबोधन

कुडाळ : सध्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये नरकासुर प्रतिमास्पर्धांचे आयोजन अन् नरकासुरदहन प्रथेतील अपप्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रत्यक्षात सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवर विजय म्हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाने भक्तांचा छळ करणार्‍या नरकासुराचा वध करून भक्तांचे रक्षण केले; परंतु काळाच्या ओघात ज्याचा वध केला, त्याच नरकासुराचा उदोउदो होतांना दिसतो. नरकासुराच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने युवकांच्या मनावर अयोग्य संस्कार बिंबतात. हे टाळण्यासाठी समाजाने भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि दीपावलीचा अध्यात्मशास्त्रीय लाभ सर्वांना व्हावा, या उदात्त हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ शहरात नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे २६ ऑक्टोरबला ‘श्रीकृष्ण प्रतिमा फेरी’ काढण्यात आली. या फेरीमध्ये धर्माभिमानी हिंदूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

या फेरीचा प्रारंभ शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालयाकडून झाला. फेरीच्या प्रारंभी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन घावनळे पंचायत समिती सदस्या सौ. मथुरा राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांच्या वंदनीय उपस्थितीत प्रारंभ झालेली फेरी शहरातील पोलीस ठाणे, जिजामाता चौक, गांधीचौक, मुख्य बाजारपेठ, शिवाजी चौक, जिजामाता चौकमार्गे टपाल कार्यालयाच्या समोरील कुडाळेश्‍वर कॉम्प्लेक्सच्या पटांगणात आल्यावर तिची सांगता झाली. फेरीच्या सांगतेनंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी उपस्थितांना नरकासुर प्रतिमादहन आणि भगवान श्रीकृष्ण पूजन, तसेच फेरी काढण्याचा उद्देश स्पष्ट केला. श्री. दैवेश रेडकर यांनी सूत्रसंचालन केले.

या फेरीत संकल्प प्रतिष्ठान, कसाल वारकरी मंडळाचे ढोलपथक आणि वारकरी, तसेच संत गाडगे महाराज कलानिकेतन आंदुर्ले यांचे भजन मंडळ यांसह अनेक धर्माभिमानी हिंदू या फेरीत सहभागी झाले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *