हिंदुद्वेष्टे अभिनेते प्रकाश राज यांनी रामलीलेविषयी हीन स्तरावर केलेल्या वक्तव्याचे प्रकरण
नवी देहली : कर्नाटकचे अभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या ५ अधिवक्त्यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. काही दिवसांपूर्वी राज यांनी रामलीलेची तुलना ‘चाइल्ड पॉर्न’शी (मुलांशी संदर्भातील अश्लील व्हिडिओशी) केली होती.
प्रकाश राज हे ‘न्यूज १८’ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘रामलीलेच्या कार्यक्रमात हेलिकॉप्टरला ‘पुष्पक विमान’ संबोधून त्यातून राम, सीता आणि लक्ष्मण उतरतात, असे दाखवणे विचित्र आहे. राम-सीता-लक्ष्मण यांच्या रूपातील ‘मॉडेल्स’ची पूजा करणे, हा मूर्खपणा आहे.’’ यावर कार्यक्रमाच्या निवेदकांनी राज यांना थांबवत म्हटले, ‘‘जनता यावरून मत देते. जनतेला याविषयी काही अडचण नाही.’’ यावर राज म्हणाले, ‘‘लोक यावर मत देतात, तर त्यांना काय सोडून द्यायचे ? मग तर लोक ‘चाइल्ड पॉर्न’ही पाहतात. मग त्यांनाही सोडून द्यायचे का ? रामलीलेसारखे कार्यक्रम आपल्या समाजासाठी नाहीत. याने अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.’’ (प्रकाश राज यांचा जावईशोध ! रामलीला पाहून किती अल्पसंख्याकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते, याचे उत्तर राज यांनी द्यावे. अयोध्येत तर मुसलमान बांधव रामलीलेचे आयोजन करण्यात हिंदूंना साहाय्य करतात. अशा वेळी प्रकाश राज यांनी अशी गरळओक करणे म्हणजे आपल्या मनातील हिंदु धर्माविषयीचा द्वेष अल्पसंख्याकांच्या नावावर खपवण्यासारखे नव्हे काय ? हिंदूंनी अशा अभिनेत्यांवर भावना दुखावल्याच्या प्रकरणी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी सरकारकडे करायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात