विधानभवनाच्या पायर्यांवर शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांची संतप्त निदर्शने !
मुंबई : कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत आणि साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानात मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ अनधिकृतपणे बुजवून तेथे शौचालय बांधण्याचे कृत्य पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे. त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची तातडीने नोंद घेऊन दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करावेत, तसेच शासनाने १५ एप्रिल २०१६ पर्यंत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणचे अनधिकृत शौचालय स्वतःहून पाडून टाकावे अन्यथा शिवसैनिक आपल्या पद्धतीने करसेवा करून ते शौचालय पाडतील, अशी चेतावणी कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी विधानभवनाच्या परिसरात केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला दिली.
या वेळी झालेल्या आंदोलनात शिवसेना आणि भाजप यांचे आमदार सहभागी झाले होते. यामध्ये शिवसेनेचे आमदार सर्वश्री गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, सत्यजित पाटील, भरतशेठ गोगावले, तसेच भाजपचे आमदार सर्वश्री नरेंद्र पवार, प्रशांत ठाकूर, शिवाजीराव कर्डिले आदी सहभागी झाले होते.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने पुरातत्व खात्याला विचारात न घेता मंदिराच्या प्राचीन रचनेत अनधिकृतपणे पालट केले आहेत. पुरातत्व कायद्यानुसार हा दखलपात्र गुन्हा आहे. या संदर्भात १५ एप्रिल २०१३ या दिवशी कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सदर शौचालय हटवण्याचे आदेश दिले होते; परंतु त्या आदेशाला मंदिर समितीने केराची टोपली दाखवली. या संदर्भात विविध संघटनांनी वारंवार निवेदने देऊन, पोलीस तक्रारी करून, आंदोलने करूनही मंदिर समिती आणि पुरातत्व खाते यांनीही याविषयी काहीही केले नाही. आतातरी मनकर्णिका कुंडावरील शौचालय हटवून ते कुंड भाविकांसाठी तात्काळ खुले करावे, अन्यथा होणार्या परिणामांना सर्वस्वी प्रशासनच उत्तरदायी राहील, असे या वेळी सांगण्यात आले.
करसेवेत भाजपचा सक्रीय सहभाग असेल ! – आमदार नरेेंद्र पवार, भाजप
आम्ही सत्तेवर आहोत, हा विषय येथे महत्त्वाचा नसून हा जनतेच्या भावनेचा, श्रद्धेचा प्रश्न असून तो सोडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मनकर्णिका कुंडावरील शौचालय तातडीने काढून टाकले नाही, तर आम्ही करसेवेत सक्रीय सहभाग घेऊन ते पाडू !
मनकर्णिका कुंडावरील शौचालय काढल्यासच आंदोलन थांबेल ! – आमदार सत्यजित पाटील, शिवसेना
हा विषय गंभीर असून हा भक्तांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. मनकर्णिका कुंडावरील शौचालय काढल्यावरच आंदोलन थांबेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात