बेंगळुरू : विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांसाठी ‘विजयवाणी’ वृत्तपत्र, ‘दिग्विजय’ वृत्तवाहिनी आणि ‘कण्व स्टार रिसॉर्ट’ यांच्या वतीने ‘महिला व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्याचा कार्यक्रम २६ ऑक्टोबर २०१९ या दिवशी येथे कण्व रिसॉर्टमध्ये पार पडला. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भव्या गौडा यांना सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या सेवेविषयी पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमास बृहत बेंगळुरू महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर सौ. हेमलथा गोपालय्या, कासियाचे उपाध्यक्ष के.बी. अरासाप्पा, करुणादा सेनेच्या महिला शाखेच्या अध्यक्ष हेमावती, इमर्ज संघटनेचे अध्यक्ष औन्द्रे डिसुझा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील इतर १० महिलांना गौरवण्यात आले.
सौ. भव्या गौडा यांनी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले, ‘‘सनातन धर्मात महिलांना सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. भारताच्या इतिहासात शूर महिलांनी धर्मपालन केल्याने त्या राणी म्हणून राज्य करू शकल्या, तसेच त्या महान विद्वानही बनल्या. आपणही धर्मपालन करून भारताला बळकट बनवूया.’’