विधानपरिषदेत शनिशिंगणापूर मंदिरातील महिला प्रवेश प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांना पोटशूळ !
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही शनिशिंगणापूर येथील शनि मंदिराच्या गाभार्यात भूमाता ब्रिगेडच्या सदस्यांना चौथर्यावर प्रवेश दिला नसल्याचे कारण पुढे करत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडत काँग्रेसचे आमदार संजय सावंत यांनी विधान परिषदेत चर्चेची मागणी केली होती. या चर्चेच्या वेळी सभापतींनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विद्या चव्हाण यांना बोलण्याची संधी दिली. या वेळी शासनाची भूमिका ही महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याची आहे का ? राज्यशासनाची तशी इच्छा असल्याचे दिसत आहे. हा न्यायालयाचा अवमान असून त्यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
हे शासन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांच्या विचाराने चालत आहे, असा कांगावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केला. या वेळी सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आले. या वेळी संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी नाकारलेल्या प्रस्तावावर सभापतींनी विरोधकांना बोलण्याची संधी दिल्याने त्यांच्याकडून एकतर्फी आरोप करण्याची पद्धत चालू झाली आहे. ही पद्धत चुकीची आहे, असे सांगितले.
हिंदु जनजागृती समिती राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्य करते, तसेच सनातन प्रभातमधूनही सातत्याने राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी लिखाण केले जाते. अशा विचारांची आज देशाला आवश्यकता आहे, हे अनेक संत, लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी मान्य केले आहे. असे असतांना आमदार विद्या चव्हाण यांना अशा विचारांचा पोटशूळ उठणे, हा हिंदुद्वेषच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात