नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या समान विचारधारेमुळे एकत्र आलेल्या भाजप-शिवसेना महायुतीला महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्याचा कौल राज्यातील जनतेने दिला आहे. दोन्ही पक्षांचे नेते हे राज्याचे, तसेच हिंदु समाजाचे हित जाणतातच; मात्र सरकार स्थापनेविषयी होणार्या विलंबाचा लाभ विरोधी निधर्मी पक्ष घेत आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्यांची मोठी हानी झालेली आहे. अशा वेळी महाराष्ट्रातील जनतेच्या व्यापक हितासाठी अन् हिंदुहितासाठी भाजप-शिवसेना यांनी लवकरात लवकर एकत्र घेऊन महाराष्ट्रात महायुतीची स्थिर-सत्ता स्थापन करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे. ही भूमिका केवळ आमचीच नव्हे, तर समस्त हिंदुत्वनिष्ठ, वारकरी, तसेच विविध आध्यात्मिक आणि राष्ट्रप्रेमी संघटना यांचीही संघटित हिंदुशक्तीचे विभाजन होऊ नये, अशीच भूमिका आहे.
मागे 1992-93 मध्ये अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवरील बाबरी मशीद पाडल्यावर महाराष्ट्रात दंगली पेटल्या होत्या. लवकरच सर्वोच्च न्यायालय श्रीरामजन्मभूमीच्या संदर्भात निकाल देणार असून, त्यानंतरही देशविरोधी शक्ती देशात अराजक माजवू शकतात. अशा स्थितीत राज्यात स्थिर आणि सक्षम सरकार स्थापन होणे आवश्यक आहे, ही राज्यातील हिंदुत्वनिष्ठांची भावना आहे.