बँकॉक : व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी भारत सध्या जगातील आकर्षक अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारतात व्यापार करणे पूर्वीच्या तुलनेत सुलभ झाले आहे. देश सध्या संक्रमणाच्या स्थितीतून जात आहे. देशाने साचेबद्ध नोकरशाही पद्धतीने काम करणे थांबवले आहे. व्यवसायाच्या संदर्भात आता भारताकडे अनेक संधी आणि सुविधा आहेत. भाजप शासनाने २०१४ मध्ये पदभार स्वीकारला, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था २ ट्रिलियन डॉलर्स होती; मात्र आता ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे ध्येय आहे. भारतात गुंतवणूक करण्यासाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकॉक येथील उद्योजकांना केले. येथे आयोजित आदित्य बिर्ला समूहाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या थायलंड दौर्यावर आहेत. या कालावधीत ते असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स (आसियान), पूर्व आशिया आणि प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आर्सीईपी) शिखर परिषदेत सहभागी होतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात