हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना निवेदन
कोल्हापूर : खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाड्यापेक्षा अधिकाधिक दीडपट भाडे आकारण्याचा (शासनाचे दर १०० रुपये असतील, तर खासगी ट्रॅव्हल्सवाले १५० रुपये घेऊ शकतात.) नियम २७ एप्रिल २०१८ च्या शासन आदेशाद्वारे करण्यात आला आहे; मात्र तरीही खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक दिवाळीत, अन्य सणांच्या वेळी, तसेच सुटीच्या कालावधीत तिकीट दरात दुप्पट-तिप्पट वाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत. याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने खासगी टॅ्रव्हल्स व्यावसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत ४ नोव्हेंबर या दिवशी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, कागल तालुकाप्रमुख श्री. अशोक पाटील, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. बंडा पाटील आणि श्री. शशिकांत पाटील, शिवसेना आणि संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. संजय कुलकर्णी, श्री. राजेंद्र शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, डॉ. सुरेश आनंदे, श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की…
१. कोल्हापूर ते पुणे या प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक सणांचा कालावधी सोडून २५० रुपये ते ३०० रुपये घेतात; मात्र दिवाळीच्या काळात त्यांचे तिकीटदर ५०० ते ७०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले होते. कोल्हापूर-मुंबई ४०० ते ५०० रुपये असतांना सध्या ८०० रुपये, १ सहस्र रुपये ते १ सहस्र २०० रुपये इतके आकारण्यात येत आहे. राज्यात सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. शासन निर्णयाची कार्यवाही होत नसल्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांचे फावले आहे.
२. यावर उपाययोजना म्हणून प्रथम शासन निर्णयाची सर्वत्र प्रसिद्धी आणि जागृती करावी. प्रत्येक खासगी प्रवासी बसवर आणि तिकीट केंद्रावर संबंधित मार्गावरील शासकीय परिवहन सेवेचे दरपत्रक आणि खासगी दरपत्रक दर्शनी भागात लावावेत, तक्रार करण्यासाठी शासकीय अधिकार्यांचे संपर्क क्रमांक अन् पत्ते देण्यात यावेत. खासगी ट्रॅव्हल्सचे संकेतस्थळ, अॅप, तसेच खासगी बस तिकिटाच्या पुढील वा मागील बाजूस हे दर प्रसिद्ध करणे कायद्याने बंधनकारक करावे.