Menu Close

कर्तारपूर कॉरिडॉरमार्गे येणार्‍या भारतियांना पारपत्र अनिवार्य ! – पाक सैन्य

पंतप्रधान इम्रान खान यांच्या निर्णयाच्या विरोधात पाक सैन्याची भूमिका

पाकच्या पंतप्रधानांचा निर्णय पाकचे सैन्य पालटत असेल, तर पाकचा कारभार पाकचे सैन्यच चालवते, हे जगजाहीर होते. त्यामुळे इम्रान खान यांच्याशी भारताने कसलेही राजनैतिक संबंध ठेवू नयेत, हेच स्पष्ट होते !

इस्लामाबाद (पाकिस्तान) : शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या पाकिस्तानच्या पंजाबमधील कर्तारपूर येथील ननकाना साहिब गुरुद्वारापर्यंत जाण्यासाठी भारत आणि पाक सीमेवर ३ कि.मी. अंतराचा कॉरिडॉर (मार्गिका) बांधण्यात आला आहे. या मार्गाद्वारे गुरुद्वारामध्ये भारतातून जाणार्‍या भाविकांना पारपत्राची आवश्यकता लागणार नाही, असे ट्वीट पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी १ नोव्हेंबर या दिवशी केले होते; मात्र याच्या विरोधात पाक सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ‘कर्तारपूरला येणार्‍या भारतियांना पारपत्र (पासपोर्ट) अनिवार्य असेल’, असे म्हटले आहे.

आवश्यक कागदपत्रांमध्ये कोणताही देश स्वतः पालट करू शकत नाही ! – भारत

पाककडून पारपत्राविषयी सातत्याने विरोधाभासी माहिती मिळत आहे. पाकशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत यासंबंधी आवश्यक त्या कागदपत्रांविषयी चर्चा झाली आहे. त्यामध्ये कोणताही देश (पाकिस्तान किंवा भारत) स्वतः पालट करू शकत नाही. आधी झालेल्या चर्चेनुसार पारपत्र आवश्यक आहेच. तसेच कार्यक्रमाचे नियोजन आणि सुरक्षाव्यवस्था या दोन्हीसंबंधी पाकिस्तान अजूनही गंभीर नाही, असे प्रतिपादन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत केले.

कॉरिडॉरची पाहणी करण्यासाठी भारतीय पथकाला पाकने अनुमती नाकारली !

कॉरिडॉरच्या पाहणीची अनुमती नाकारण्यामागे पाकचा घातकी डाव ओळखून भारताने कारवाईसाठी सज्ज राहायला हवे !

नवी देहली : कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनापूर्वी तेथील व्यवस्था आणि राजशिष्टाचार यांची पाहणी करण्यासाठी भारताने एक पथक पाठवण्यासाठी अनुमती देण्याची विनंती पाककडे केली होती. भारताची ही विनंती पाकने फेटाळून लावत ‘केवळ भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांना कर्तारपूरच्या ठिकाणी जाऊ देऊ’, असे सांगितले आहे. कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन ९ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.

भारताने पाकला सांगितले की, कर्तारपूरला (भारतातून) जाणार्‍या भाविकांच्या सुरक्षेचे दायित्व पाकच्या सुरक्षायंत्रणेने घ्यावे. तेथे जाण्याच्या मार्गात खलिस्तानवादी घुसू नयेत आणि भारतविरोधी कारवाया घडू नयेत. ‘सिख फॉर जस्टिस’ या संघटनेच्या भारतविरोधी कारवायांमुळे कर्तारपूरला भेट देणार्‍या अतीमहत्त्वाच्या व्यक्तींना सर्वोच्च सुरक्षा द्यावी.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पाककडे केली ‘झेड प्लस’ सुरक्षेची मागणी

कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आणि कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणार्‍या सर्वपक्षीय शिष्टमंडळात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह सहभागी होणार आहेत. गुप्तचर यंत्रणेने कर्तारपूरमध्ये आतंकवादी आक्रमणाची शक्यता वर्तवल्याने सिंह यांनी पाकिस्तानकडे ‘झेड प्लस’ श्रेणीची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *