नवी देहली : अफगाणिस्तानमधील बादशहा अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झालेल्या पानीपतच्या युद्धावरील ‘पानीपत’ नावाचा हिंदी चित्रपट ६ डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला आहे. दुसरीकडे या चित्रपटावरून अफगाणिस्तान सरकारने चिंता व्यक्त केली आहे. सरकारने चित्रपटाच्या निर्मात्यांना याविषयी सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारचे म्हणणे आहे की, चित्रपट प्रसिद्ध करण्याचीही योग्य वेळ नाही. कारण हा चित्रपट पानीपतच्या तिसर्या युद्धावर आधारित आहे जे अनेक वर्षांपूर्वी झालेले आहे.
१. अफगाणिस्तानमध्ये अब्दाली याला आदराचे स्थान आहे. या चित्रपटातून त्याचा अवमान होऊ नये, असे तेथील लोकांचे म्हणणे आहे, असे सामाजिक माध्यमातून समोर आलेले आहे. काही दिवसांपूर्वी भारतातील अफगाणिस्तानचे माजी राजदूत शायदा अब्दाली यांनी ट्वीट करून म्हटले होते की, मला आशा आहे की, या चित्रपटातून इतिहासातील महत्त्वाच्या घटनेला लक्षात ठेवले जाईल.
२. मुंबईतील अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूतावासातील अधिकारी नसीम शरीफी यांनी ट्वीट करून म्हटले की, गेल्या दीड वर्षांपासून अफगाण सरकार हाच प्रयत्न करत आहे की, अहमद शाह अब्दाली यांचा या चित्रपटातून अवमान होणार नाही. कोणताही अफगाणी हे सहन करू शकणार नाही. या चित्रपटात अब्दाली यांची भूमिका करणारे अभिनेता संजय दत्त यांनी आम्हाला विश्वास दिला आहे की, जर त्यांची भूमिका वाईट असती, तर मी ती केलीच नसती. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सध्याचे संबंध मैत्रीचे असल्याने चित्रपटातील काही विषय पुन्हा चर्चेत येऊन या संबंधावर परिणाम होईल, असेच अफगाणिस्तान सरकारला वाटत असल्याचे म्हटले जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात