हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक तेथे वकिली कौशल्याचा वापर करा ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद
वाराणसी : समाजाची व्यवस्था कायद्याने निर्धारित केलेली असते. अधिवक्त्यांना कायद्याचा अभ्यास असतो. यासाठीच देशाला घडवण्यात अधिवक्त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. आज आपल्याला पुन्हा समाज घडवायचा आहे. सध्याच्या व्यवस्थेत पालट करण्यासाठी या कार्यात अधिवक्त्यांचा सहभाग आवश्यक आहे. आपल्याला अधिवक्ता म्हणून एकाच वेळी ‘संघटक’, ‘पत्रकार’, ‘नेता’, ‘कार्यकर्ता’ यांसारख्या भूमिका पार पाडाव्या लागतील. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी स्वतःच्या चौकटीबाहेर जाऊन कार्य करावे लागेल. आपण अधिवक्ता आहोत, तर न्यायालयात निवेदन देणे किंवा न्यायालयीन संघर्ष करणे आदी करत असतांनाच आवश्यक त्या ठिकाणी अधिवक्त्यांनी त्यांच्या आपल्या वकिली कौशल्याचा वापर करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी ९ नोव्हेंबर दिवशी या दिवशी झालेल्या अधिवक्ता अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात केले. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात अधिवक्त्यांचा ‘कार्यकर्ता अधिवक्ता’ या भूमिकेतून सहभाग’ या विषयावर ते बोलत होते. भगवान विश्वनाथ आणि गंगामाता यांच्या पावन भूमीत असलेल्या वाराणसी शहरात ९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ‘उत्तर आणि पूर्व भारत हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा शुभारंभ झाला. त्या अंतर्गत ९ नोव्हेंबर दिवशी ‘अधिवक्ता अधिवेशन’ उत्साही वातावरणात पार पडले. या वेळी अधिवक्त्यांनी रामराज्य स्थापनेचा संकल्प केला. या अधिवेशनाला उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा आणि बंगाल राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता आणि हिंदु संघटनांचे प्रतिनिधी आदी सहभागी झाले होते.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, ‘इंडिया विथ विज्डम’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ, अधिवक्ता दिनेश नारायण सिंह आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाला आरंभ झाला. भावपूर्ण वातावरणात वेदमंत्रपठण झाल्यावर अधिवक्ता प्रशांत वैती यांनी सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना’ याविषयी अधिवक्त्यांना माहिती दिली.
‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे केवळ ‘मत’ नाही, तर ‘व्रत’ असायला हवे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती
अधिवेशनाचा उद्देश सांगतांना पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राची स्थापना हे केवळ ‘मत’ नाही, तर ‘व्रत’ असायला हवे. हेच व्रत आत्मसात करून हिंदु जनजागृती समिती अखिल भारत हिंदू राष्ट्र अधिवेशनांचे आयोजन करते. हिंदु राष्ट्र अधिवेशनांमधून होत असलेले हिंदुत्वनिष्ठांचे हेच महासंघटन हिंदु राष्ट्राची स्थापना करील, यात काही शंका नाही. ‘हिंदु राष्ट्र’ ही राजकीय संकल्पना नसून ती एक सत्त्वगुणप्रधान राज्यव्यवस्था आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ भारतापर्यंतच सीमित नसून भविष्यात विश्वभरात हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.’’
‘राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्यात अधिवक्त्यांचे योगदान’ या सत्रात ‘इंडिया विथ विज्डम’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी म्हणाले की, सार्वजनिक जीवन, सार्वजनिक व्यवस्था सुरक्षित नसेल, तर आपणही सुरक्षित नाही. आपण सर्वाधिक वेळ सार्वजनिक जीवनात घालवतो; परंतु आपण व्यक्तिगत जीवन आणि हित यांचाच विचार अधिक करतो.
१. मागील दशकापासून मी इंडिया विथ विज्डम संघटनेच्या माध्यमातून आणि व्यक्तिगतरित्या प्रयत्न करत आहे. तुम्ही अयोग्य व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवता, तेव्हा प्रशासन केवळ तात्पुरती उपाययोजना करते. काही वेळा राजकीय, तर कधी जमावाचे लांगूलचालन केले जाते.
२. वाराणसीमध्ये कलम १४४ चे उल्लंघन होत होते. कलम १४४ लागू असतांना लोकसभा निवडणुकीच्या काळात एका नेत्याने जुलुसाची अनुमती मागितली असता पोलिसांनी ‘अधिवक्ता कमलेश त्रिपाठी तक्रार प्रविष्ट करतील’ या कारणाने ती नाकारली. आज धार्मिक जुलुसांच्या प्रकरणांमध्ये दुटप्पी मापदंड वापरले जातात. या संदर्भातही आम्ही कार्य करत आहोत.
३. वाराणसीमध्ये बकरी ईदच्या दिवशी होणारी उंटांची हत्या तक्रार प्रविष्ट केल्यानंतर बंद करण्यात आली. रस्त्यांवरील धार्मिक स्थळे हटवण्याचा आदेश प्रशासनाकडून आल्यावर केवळ मंदिरेच पाडली जातात. यासाठीही मी लढा देत आहे.
निखिल बंग नागरिक संघाचे आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिवक्ता उदय नारायण चौधरी यांनी ‘बंगालमधील अधिवक्त्यांची स्थिती’ याविषयी विचार व्यक्त केले. ‘हिंदु जनजागृती समितीला बंगालमध्ये कायदेशीर साहाय्य करण्यासाठी मी सक्रीय असेन’, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. या वेळी अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्याचा संक्षिप्त आढावा उपस्थितांसमोर मांडला.