Menu Close

रामजन्मभूमीच्या निकालाविषयी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार !

रामजन्मभूमीच्या निकालावरील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे विचार

राममंदिरासाठी अनेकांनी मृत्यू पत्करला असतांना मशिदीसाठी भूमी देण्याचा निर्णय योग्य वाटत नाही ! – भारताचार्य सु.ग. शेवडे, प्रवचनकार

भारताचार्य सु.ग. शेवडे

‘सगळेच देण्याची वेळ आली, तर शहाणा माणूस अर्धे सोडतो’, असे न्यायालयाने बाबरी मशिदीसाठी अन्य ठिकाणी ५ एकर भूमी देण्याच्या निर्णयावरून वाटते. हे आम्ही मान्य करतो; मात्र हे योग्य वाटत नाही. त्याला कारण आहे. अयोध्या हे श्रीरामाचे जन्मस्थान आहे. ८ लाख ६९ सहस्र वर्षे या स्थानाचे महत्त्व आहे. परकीय आक्रमकांनी या ठिकाणी असलेले श्रीरामाचे मंदिर तोडले. ते मिळवण्यासाठीही आपला इतका काळ गेला. अनेकांना मृत्यू पत्करावा लागला. असे असतांना बाबरी मशिदीसाठी ५ एकर भूमी देणे, हे काही योग्य वाटत नाही.

हा सत्याचा विजय ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, वृंदावन

हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो. अयोध्या ही रामजन्मभूमीच आहे, हे न्यायालयानेही मान्य केले. हा सत्याचा विजय आहे. आता निर्माण होणार्‍या भव्य मंदिरांमध्ये हिंदू मोकळेपणाने पूजाअर्चा करू शकतील; पण ‘अयोध्येच्या पंचक्रोशीत मशीद असायला नको’, अशी इच्छा आहे. ‘बाबर हा आक्रमणकर्ता आहे’, असे मान्य झाल्यावर मग ‘मुसलमान पक्षकारांना मशिदीसाठी भूमी कशासाठी ?’, असा प्रश्‍न पडतो. रामजन्मभूमी मुक्त झाली, आता कृष्णजन्मभूमी म्हणजे मथुरा आणि काशी विश्‍वनाथ यांची मंदिरेही मुक्त व्हावीत, ही अपेक्षा !

विलंबाने का होईना, रामाची जागा रामाला पुन्हा मिळाली ! – श्री. दुर्गेश परुळकर, लेखक आणि व्याख्याते, मुंबई

श्री. दुर्गेश परुळकर, लेखक आणि व्याख्याते

मंदिर पडल्यानंतर आता नवीन राममंदिर स्थापन होत आहे, याचा आनंद आहे. रामाच्या जागेवर जे अतिक्रमण झाले होते, त्याला न्याय मिळाला आहे. या निर्णयाचे स्वागत आणि आनंद आहे. विलंबाने का होईना रामाची जागा रामाला पुन्हा मिळाली. आपसांतील मतभेद विसरून सर्व जण एकत्रित राहणार असतील, तर मुसलमानांना भूमी देण्याचे नक्कीच स्वागत आहे. तुम्ही तुमचा धर्म पाळा, आम्ही आमचा धर्म पाळू आणि आपण दोघांनी राष्ट्र-धर्म पाळू. ही नवीन विचारसरणी यानिमित्ताने देशात रुजत असेल, तर त्याचे स्वागत आहे. हिंदूंनी मुसलमानांचा मुसलमान म्हणून कधीच विरोध केलेला नाही. राष्ट्रप्रवाहात सहभागी न होता सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्याला विरोध केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली ! – अधिवक्ता उज्ज्वल निकम, विशेष सरकारी अधिवक्ता

अधिवक्ता उज्ज्वल निकम

या निकालामुळे सर्व पक्षांना समाधान मिळेल. कुणाचाही पराभव झाल्याचे वाटणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था देशात चांगल्या रितीने राखायची आहे.

अनेक वर्षे संघर्ष चालू होता तो कुठे तरी मिटला ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक-व्याख्याते, मुंबई

डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक-व्याख्याते

आजची आपली पिढी भाग्यवान आहे. त्यांना हा निर्णय बघता आला आणि राममंदिर उभारलेलेही बघता येईल. गेली अनेक वर्षे संघर्ष चालू होता, तो संघर्ष कुठे तरी मिटल्याचे चिन्ह दिसत आहे. म्हणून या दृष्टीकोनातून या निकालाचे स्वागत व्हायला हवे.

५०० वर्षांत ज्यांनी कोणी त्याग नि बलीदान केले, ते यशस्वी झाले ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना.

श्री. प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

श्रीरामजन्मभूमीवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. हा १०० कोटी हिंदूंचा ऐतिहासिक नि अविस्मरणीय ‘विजय दिवस’ आहे. आज रामनवमीसारखे वातावरण आहे. ‘५०० वर्षांत ज्यांनी कोणी त्याग नि बलीदान केले, ते व्यर्थ गेले नाही. आज ते यशस्वी झाले आहे’, असे वाटते. आता शासनाने मंदिर उभारणीसाठी संधी उपलब्ध करून द्यावी, असा मी आग्रह करतो.

मुसलमानांना ५ एकर भूमी देण्याच्या न्यायालयाच्या वक्तव्यावर शासनाने निर्णय घ्यायचा आहे. भूमी देणे, मशीद बांधायला सांगणे, शांतता प्रस्थापित करणे, हे न्यायालयाच्या हद्दीत येत नाही. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ते वक्तव्य दिले असेल, पण ते शासनाशी संबंधित आहे. शासनाने ते निर्धारित करायला हवे.

हे आंदोलन राममंदिरांच्या विद्यमान संख्येत भर टाकण्यासाठी नसून भारतीय मुसलमानांना गझनी, बाबर किंवा औरंगजेब या क्रूरकर्मी धर्मांधांपेक्षा राम, कृष्ण, अशोक यांच्या परंपरेशी जोडण्यासाठी चालू झाले आहे. त्यांना राष्ट्रीय एकतेच्या मार्गावर घेऊन जाण्याचा तो राजमार्ग आहे. संतांच्या नेतृत्वाखाली चालणारे हे सात्विक पवित्र असे विना राजकीय आंदोलन आहे. ज्याप्रमाणे कन्याकुमारीचे विवेकानंद स्मृती मंदिर जसे राष्ट्राच्या एकात्मतेचे प्रतीक आहे, तसेच जन्मभूमीवरील राममंदिर आहे.

भविष्यातही राष्ट्र आणि धर्म कार्यात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी मोलाचे योगदान द्यावे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. मागील कित्येक वर्षांपासून हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी घेतलेल्या कष्टाचे हे फळ आहे. या सुनावणीत हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते सहभागी होते, याविषयी आम्हाला कृतज्ञता आहे. येणार्‍या काळात राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे असेच ठोस आणि मोलाचे योगदान मिळत राहावे, यासाठी प्रयत्नरत राहू.

राममंदिराची उभारणी हा एक महत्त्वाचा आरंभ आहे. काशी, मथुरा यांसारख्या अनेक विषयांवर न्यायालयीन संघर्ष अटळ आहे. अयोध्येत होणारे राममंदिर हे केवळ भव्य इमारतीच्या स्वरूपात नसेल, तर जगाला हिंदु धर्माचा आध्यात्मिक वारसा शिकवणारे धर्माचे एक शक्तीकेंद्र असेल, यासाठीही प्रयत्न करू. आपापल्या स्तरावर त्याग केल्यास हिंदु राष्ट्र कठीण नाही. ‘या त्यागासाठी सिद्ध व्हावे’, असे सर्व हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना आवाहन आहे.

हिंदूंच्या आस्थेविषयीचा निर्णायक निकाल ! – राहुल कौल, पनून कश्मीर

राहुल कौल, पनून कश्मीर

भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांच्या संदर्भातील हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. हिंदूंच्या आस्थेविषयीचा हा निर्णायक निकाल असून सर्वांनी तो मान्य करायला हवा. १०८ कोटी हिंदूंची आस्था या निकालामुळे सर्वतोपरी स्वीकारली गेली आहे. मी न्यायालयाच्या निर्णयावर कोणतीही टिपणी करत नाही; पण माझे हे व्यक्तीगत मत आहे की, बाबर हा कोणत्याही धर्मसमुदायाचा प्रतिनिधी नाही, तर आक्रमक होता. त्याने अनेक मंदिरांचा विध्वंस केला. याकडे ऐतिहासिक दृष्टीनेही पाहायला हवे. बाबरच्या नावे अन्य ठिकाणी मशीद उभी करणे, हे वेगळ्या प्रकारे ध्वनीत होते. असे असले, तरी या निकालाद्वारे हिंदूंच्या आस्थेचा विचार झाल्याने हा निकाल महत्त्वपूर्ण आहे.

हा धर्माचा विजय आहे ! – अधिवक्ता गोविंद के. भरतन्, शासकीय अधिवक्ता, केरळ उच्च न्यायालय

अधिवक्ता गोविंद के. भरतन्

अवघ्या ७० वर्षांनी आता या विषयाला एक विराम लागला. उच्च न्यायालयाचा निकाल उल्लेखनीय आहे. पाच ही न्यायाधिशांचे या विषयावर एकमत झाले. ‘वादग्रस्त भूमी हिंदूंची आहे’, यावर त्यांचे एकमत आहे. बाबरी ढाच्याच्या अवशेषाखाली इमारतीचे अवशेष आहेत, असेही त्यांनी म्हटले; पण ‘ते मंदिराचे आहेत’, असे त्यांनी स्पष्ट केले नाही. ‘हिंदूंची श्रद्धा आणि विश्‍वास यांनुसार ‘भगवान श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला’, हे निर्विवाद आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे. हा धर्माचा विजय आहे. काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या ढोंगी, धर्मनिरपेक्ष राजकारणातून सुटून आता आपली न्याययंत्रणा हिंदुत्वाच्या दिशेने चालू लागली आहे.

माझ्या मते मुसलमानांना ५ एकर भूमी देणे, हे त्यांच्या भावना सांभाळण्याकरता आहे. असे असले, तरीही या निर्णयाचा मी आदर करतो, कारण या दोन्ही धर्मांतील लोकांनी शांतता जपणे, हे सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित आहे. या निर्णयावर आपली प्रतिक्रिया परिपक्व आणि शांत असली पाहिजे. आपला विजय शांतपणेच साजरा करूया.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *