स्विस बँकेत भारतियांनी ठेवलेला हा पैसा भारताला परत मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत !
नवी देहली : स्विस बँकेतील भारतियांची अनेक खाती वापरात नसून त्यात असलेला पैसा आता स्वित्झर्लंड सरकारकडे हस्तांतरित केला जाणार आहे. स्विस सरकारने बंद असलेल्या अशा खात्यांची यादी वर्ष २०१५ मध्ये घोषित केली होती. या खात्यांवर कुणीही दावा केलेला नाही. या खात्यांविषयी पुरावे देऊन ती चालू करण्याचा प्रस्ताव बँकेने दिला होता. त्यातील किमान १० खाती भारतियांशी संबंधित आहेत. भारतीय निवासी, नागरिक यांची ही खाती असून त्यातील काही खाती ब्रिटीश काळातील आहेत. या खात्यांपैकी एका खात्यावर गेल्या ६ वर्षांत कोणीही दावा केलेला नाही, असे स्विस अधिकार्याने सांगितले आहे.
स्विस बँकेत बंद पडलेल्या खात्यांची संख्या २ सहस्र ६०० असून त्यात ४५ दशलक्ष स्विस फ्रँक म्हणजेच ३०० कोटी रुपयांची रक्कम आहे. या रकमेवर वर्ष १९५५ पासून कुणीही दावा केलेला नाही. स्विस बँक कायद्यानुसार ६० वर्षांत जर खातेदाराने संपर्क केला नाही, तर ते खाते बंद समजले जाते. या बेवारस खात्यांमध्ये प्रतीवर्षी भर पडत आहे. काळा पैसा ठेवण्यासाठी अनेकदा या खात्यांचा वापर करण्यात आला होता. स्विस बँकेतील भारतियांनी ठेवलेल्या पैशांचा तपशील तेथील सरकारने भारताला अलीकडचे दिला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात