Menu Close

‘उत्तर आणि पूर्व भारत हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची भावपूर्ण वातावरणात सांगता

‘गुरु’, ‘ग्रंथ’ आणि ‘गोविंद’ यांचा आधार घेऊन हिंदु राष्ट्र संस्थापनेचे कार्य करणे आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी झोकून देऊन कार्य करण्याचा सर्व हिंदुत्वनिष्ठांचा दृढ निर्धार !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

वाराणसी :  ‘गुरु’, ‘ग्रंथ’ आणि ‘गोविंद’ हे धर्मकार्याच्या यशस्वितेसाठी पुष्कळ आवश्यक आहे. गुरूंच्या मार्गदर्शनानुसार कार्य केले, तर त्याची फलनिष्पत्ती शंभर टक्के असते. धनुर्वेद (उपवेद), मनुस्मृती, बृहस्पतिनीती, शुक्रनीती, योगवासिष्ठ, रामायण, महाभारताचे शांतीपर्व इत्यादी धर्मग्रंथांमध्ये ‘राज्य कसे करावे’ याबद्दलची माहिती दिली आहे. ‘गोविंद’ हे भगवान श्रीकृष्णाचे भक्तीरूप आहे. आद्य शंकराचार्यांनी ‘भज गोविंदम्’ हा संदेश दिला होता. श्रीकृष्णाची भक्ती सोपी आहे आणि ती करण्याचे बरेच लाभ आहेत. भगवान श्रीकृष्ण धर्मसंस्थापनेची देवता आहे. ‘यदा यदा ही धर्मस्य…..’ हे भगवान श्रीकृष्णाचेच वचन आहे. थोडक्यात ‘गुरु’, ‘ग्रंथ’ आणि ‘गोविंद’ यांना अवलंबून हिंदु राष्ट्र संस्थापनेचे कार्य करणे, हीच आपली काळानुसार योग्य साधना ठरेल’, असे बहुमूल्य मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. वाराणसी येथील ‘उत्तर आणि पूर्व भारत हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या समारोपीय सत्रात ते बोलत होते. या अधिवेशनाच्या अंतर्गत ९ नोव्हेंबर या दिवशी अधिवक्ता अधिवेशन, तर १० ते १२ नोव्हेंबर या ३ दिवसांच्या कालावधीत हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले. समारोपीय सत्रामध्ये राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्याहितार्थ विविध ठरावांना सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.

सद्गुरु (डॉ.) पिंगळे ‘ग्रंथ’ आणि ‘गोविंद’ यांचे महत्त्व विशद करतांना पुढे म्हणाले, ‘‘इंग्रज भारतात येण्याआधीपासूनच आपल्या देशात कौटिल्याचे अर्थशास्त्र प्रसिद्ध आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, जलाशयात राहणारा मासा पाणी कधी पितो, हे कळत नाही.

त्याचप्रकारे शासनात राहणारा व्यक्ती पैसे कधी खातो, ते कळत नाही. अशा लोकांना दंड देण्यासाठी आर्य चाणक्याने ‘प्रदेष्टा’ म्हणजेच आजच्या भाषेत भ्रष्टाचारविरोधी विभाग (अँटी करप्शन ब्यूरो) स्थापित करण्याचे सुचवले आहे. न्यायाधिशानेच भ्रष्टाचार केला, तर त्याची पूर्ण संपत्ती शासनाधीन करून त्याला देशातून काढण्याची आज्ञा दिली आहे. स्वातंत्र्यानंतर ७ दशकांमध्ये न्यायदानाच्या क्षेत्रात पुष्कळ भ्रष्टाचार झाला असूनही केवळ एका न्यायाधिशावर कारवाई केली गेली. यासाठीच कौटिल्याचे अर्थशास्त्र राज्यव्यवस्थेमध्ये असायला हवे. आज आपणही धर्मग्लानीच्या या काळात धर्मसंस्थापना म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करत आहोत. या कार्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती केल्यामुळे आपल्याला निश्‍चितच आशीर्वाद मिळेल. भविष्यकाळ भीषण आहे. या काळात जिवंत राहाण्यासाठी श्रीकृष्णाची भक्ती आवश्यक आहे; कारण भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे, ‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्‍लोक ३१), म्हणजेच माझ्या भक्तांचा कधीही नाश होणार नाही. श्रीकृष्णाची भक्तीसाधना करण्याचा सोपा मार्ग म्हणजे ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करणे. कालमहिम्यानुसार हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करणार्‍यांच्या साधनेसाठी वर्ष २०२३ पर्यंत श्रीकृष्णाचा आणि त्यानंतर श्रीरामाचा नामजप पूरक असणार आहे.’’

अधिवेशनाच्या ४ दिवसांच्या कालावधीत हिंदु धर्म आणि हिंदूंवर होणारे आघात, हिंदुत्वाचे कार्य करतांना आलेले अनुभव, हिंदूसंघटन आणि त्या मार्गान्वये हिंदु राष्ट्राची आवश्यकता इत्यादी सूत्रांवर विचारांचे आदान-प्रदान, तसेच परिसंवाद घेण्यात आले. या अधिवेशनात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल, ओडिशा, आसाम, त्रिपुरा आदी राज्यांतून, तसेच नेपाळ येथून अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ नेते, कार्यकर्ते, विचारवंत, संपादक, अधिवक्ते आदींनी सहभाग घेतला.

उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्याचा आणि धर्मरक्षणाचे कार्य झोकून देऊन करण्याचा दृढ निर्धार या प्रसंगी व्यक्त केला.

रामजन्मभूमीचा निकाल हा हिंदु राष्ट्रासाठी ईश्‍वराचा आशीर्वाद ! – सद्गुरु (डॉ.) पिंगळे

उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेकडे साक्षात् ईश्‍वराचे स्थान असते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रामजन्मभूमीचा निकाल आला. हा हिंदु राष्ट्रासाठी ईश्‍वराचा आशीर्वाद आहे. आज कार्तिक पौर्णिमा म्हणजेच देवदिवाळीच्या दिवशी आपण सर्वजण या ठिकाणाहून आपापल्या राज्यात जात आहोत, हासुद्धा एक शुभसंकेत आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *