Menu Close

राममंदिराविषयीचा आराखडा आणि न्यासाचे स्वरूप यांविषयी तडजोड करणार नाही : विहिंपची चेतावणी

नवी देहली : राममंदिरचा आराखडा सिद्ध आहे. न्यासाच्या संदर्भात आमचा विचार स्पष्ट आहे. आमची आशा आहे की, सरकार असे कोणतेही काम करणार नाही, ज्यामुळे अडचणी निर्माण होतील, असे विश्‍व हिंदु परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी म्हटले आहे.

१. चंपत राय म्हणाले की, चेंडू सरकारच्या अंगणात आहे; मात्र मंदिराच्या संदर्भातील न्यासाच्या व्यवस्थापनात केवळ हिंदु धर्माची पूजा करणार्‍या लोकांना सहभागी केेले पाहिजे. हिंदु धर्मावर श्रद्धा ठेवणार्‍या निर्गुण परंपरांचे पालन करणार्‍यांना यात सहभागी करू नये. अयोध्येतील रामानंद संप्रदायाचे आणि केवळ सगुण परंपरांचे पालन करणार्‍या शैव किंवा वैष्णव यांना यात सहभागी केले पाहिजे. सरकारमधील कोणत्याही मंत्र्याला या न्यासामध्ये सहभागी करण्याला विहिंपचा विरोध असेल.

२. श्री श्री रविशंकर यांना न्यासामध्ये सहभागी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. राय यांनी वरील मागणी त्यांना विरोध करण्याच्या दृष्टीने केल्याची चर्चा आहे.

३. राय पुढे म्हणाले की, मंदिराचे व्यवस्थापन किंवा पुजारी यांना वंशपरंपरागत स्थान देण्यात येऊ नये. अन्य धर्मियांना यात स्थान देण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही; कारण त्यांची हिंदु धर्मावर श्रद्धा नाही.  मंदिराचे व्यवस्थापन केवळ भगवान श्रीरामांची पूजा करणार्‍यांनाच मिळाले पाहिजे. जर सरकारकडून याविरोधात काही प्रयत्न झाला, तर अयोध्येत नवी समस्या निर्माण होऊ शकते आणि त्याला सरकार स्वतः उत्तरदायी असेल.

४. राय म्हणाले की, सरकारचे काम मंदिर बनवण्याचे नाही; कारण ते धर्मनिरपेक्ष असते. जर सरकार राममंदिर बनवण्यासाठी प्रयत्न करेल, तर तिला नंतर मशीदही बांधावी लागेल. सरकारने आम्हाला ट्रस्टच्या संदर्भात विचार करण्यासाठी बोलावले, तर आम्ही आमचे विचार मांडू. तसेच रामजन्मभूमी न्यास समितीने मंदिरासाठी ज्या शिळा बनवल्या आहेत, त्या राममंदिर न्यासाला देऊ.

कारसेवकांवरील खटले मागे घ्या ! – हिंदु महासभेची मागणी

कारसेवकांना ‘धार्मिक सेनानी’ घोषित करा !
कारसेवकांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी द्या !

नवी देहली : अखिल भारतीय हिंदु महासभेने वर्ष १९९२ च्या वेळी कारसेवकांवर (वर्ष १९९२ मध्ये राजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंना कारसेवक म्हणतात.) नोंदवण्यात आलेले खटले मागे घेण्याची मागणी केली आहे. या संदर्भात  हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणि महाराज यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. याचसमवेत कारसेवकांना हुतात्मा म्हणून दर्जा देण्यात यावा, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य समवेतच सरकारी नोकरी द्यावी आणि कारसेवकांना ‘धार्मिक सेनानी’ घोषित करण्याचीही मागणी केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *