हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आणि पुरातत्व खाते यांच्याकडे मागणी
पणजी : जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन करावे या मागणीचा हिंदु जनजागृती समितीने पुनरुच्चार केला आहे. हिंदु जनजागृती समितीने याविषयीचे निवेदन ११ नोव्हेंबर या दिवशी उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांना आणि काही दिवसांपूर्वी पुरातत्व खाते यांना दिले आहे. पुरातत्व खात्याचे मुख्य अधीक्षक इजार आलम हाश्मी यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘स्वदेशी विचार मंच’चे सर्वश्री मयुरेश कुष्टे, भारत हेगडे, हिंदु जनजागृती समितीचे सत्यविजय नाईक, सुशांत दळवी आणि भगवंत नाईक यांचा समावेश होता. पुरातत्व खात्याने गावागावात पुरातत्व वास्तूंच्या शोधाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करून त्या ठिकाणी आढळणारी वारसास्थळे पुरातत्व खात्याच्या सूचीत समाविष्ट करणार असल्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने ही मागणी केली आहे. पुरातत्व खात्याचे मुख्य अधीक्षक इजार आलम हाश्मी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे, तसेच ‘हातकातरो खांबा’ची पाहणी करून त्या ठिकाणी माहिती फलक लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गोमंतकातील स्वाभिमानी हिंदूंनी केलेल्या बलीदानाचे ‘हातकातरो खांब’ हे प्रतीक आहे. ‘हातकातरो खांब’ हा पोर्तुगीज राजवटीत हिंदूंवर केलेल्या क्रूर अत्याचाराचे प्रतीक आहे. हा खांब गेली १५० वर्षे जुने गोवे येथे आहे आणि याचा इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख आढळतो. या ठिकाणी ‘हात कातरो खांबा’ची ऐतिहासिक माहिती सांगणारा एकही फलक नाही. या खांबाविषयी किंवा खांबाचे जतन करण्याविषयी भारतीय पुरातत्व खाते किंवा गोवा शासनाचे पुरातत्व खाते गंभीर नसल्याचेच हे द्योतक आहे. यापूर्वी वर्ष २०१६ मध्ये गोवा शासनाचे नगरविकास खाते आणि पालिका प्रशासन यांनी जुने गोवे येथील वारसास्थळांचे जतन आणि विकास करण्यासाठी ‘मास्टर प्लान’ सिद्ध करणार असल्याचे म्हटले होते, तसेच या वेळी हिंदु जनजागृती समितीने ‘हातकातरो खांबा’ला प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन करण्याची मागणी केली होती. या वेळी ‘हातकातरो खांबा’चे जतन करण्यासमवेतच त्याच्या बाजूला कुंपण घालणे, इतिहास तज्ञांचे साहाय्य घेऊन खांबाच्या ठिकाणी खांबाविषयी माहिती देणारा फलक प्रदर्शित करणे, गोव्यात येणार्या पर्यटकांना याविषयी माहिती देणे, आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०१४ मध्येही अशाच प्रकारची मागणी गोवा शासनाकडे केली होती.