नवी देहली : महिलांना प्रार्थनास्थळी मिळणारा प्रवेश हा केवळ मंदिरापुरता मर्यादित नाही. मशिदी, तसेच पारश्यांचे प्रार्थनास्थळ अग्यारी यांचाही विचार करणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगत केरळातील शबरीमलाच्या अय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना (मासिक पाळी येणार्या महिलांसह) प्रवेश देण्याचे प्रकरण ७ न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे सोपवले आहे. सर्वोच्च न्यायालयात १४ नोव्हेंबरला झालेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीवर सरन्यायाधिशांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायाधिशांच्या घटनापिठाने हा निर्णय घेतला. यातील ३ न्यायाधिशांच्या बहुमताने हे प्रकरण ७ न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायाधीश आर्.एफ्. नरीमन आणि न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याविरोधात त्यांचे मत दिले.
१. रूढी परंपरेनुसार शबरीमलातील अय्यप्पा मंदिरात पाळी येत असल्याच्या वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्यात येत नाही. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१८ या दिवशी दिलेल्या निकालात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश देण्याचा आदेश लागू केला होता. या निकालावर एकूण ६५ याचिका प्रविष्ट झाल्या. त्यात ५६ पुनर्विचार याचिका, ४ नव्या आणि ५ हस्तांतर याचिका यांचा समावेश आहे.
२. शबरीमला मंदिराचे संचालन करणार्या त्रावणकोर देवस्वम् मंडळाने आणि केरळ सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास पाठिंबा देत सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याची भूमिका घेतली होती.
३. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायाधिशांच्या घटनापिठाने सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुनर्विचार याचिकांवरचा निकाल ६ फेब्रुवारी या दिवशी राखून ठेवला होता.
४. नायर सेवा सोसायटी, मंदिराचे तंत्री (पुजारी), त्रावणकोर देवस्वम् मंडळ, राज्य सरकार यांनी त्या निकालावर प्रविष्ट केलेल्या याचिकांवर १४ नोव्हेंबरला सुनावणी पार पडली. यात नायर सेवा सोसायटीची बाजू अधिवक्ता के. परासरन् यांनी, तर राज्य सरकारची बाजू अधिवक्ता जयदीप गुप्ता यांनी मांडली.
शबरीमला देवस्थानात स्त्रियांना प्रवेशबंदी असण्यामागील कारण
अ. भगवान अय्यप्पा हे भगवान शिव आणि श्रीविष्णूचा मोहिनी अवतार यांच्या तत्त्वापासून निर्माण झालेले आहेत. ते आजीवन ब्रह्मचारी होते. त्यांचे ब्रह्मचर्याचे पालन व्हावे, यासाठी तेथे १० ते ५० वयोगटांतील स्त्रियांना सरसकट प्रवेशबंदी आहे.
आ. भगवान अय्यप्पा स्वामींचे व्रताचरण करणार्यांना ब्रह्मचर्याचे पालन विशिष्ट कालावधीसाठी करावे लागते. हे व्रताचरणाचे अत्यंत कडक नियम आहेत. या काळात ते शबरीमला देवस्थानात दर्शनासाठी येतात. अशांच्या व्रताचरणात बाधा येऊ नये, हेही यामागील एक कारण आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात