जीवनमूल्ये आध्यात्मिक वाङ्मयात मिळतात, यावरूनच आध्यात्मिक वाङ्मयाचे महत्त्व सिद्ध होत नाही का ?
मुंबई : जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे वाचन करा, असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापिठांचे कुलगुरु आणि शिक्षणतज्ञ यांना दिला आहे. ‘आध्यात्मिक भावनेने नाही, तर त्यात दडलेली जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी याचे वाचन करावे’, असेही राज्यपालांनी या कार्यक्रमात सांगितले.
११ नोव्हेंबर या दिवशी राजभवनात प्रा. बी.एन्. जगताप, प्राचार्य अनिल राव आणि आनंद मापुस्कर यांनी लिहिलेल्या ‘रिइंजिनीयरिंंग – हायर एज्युकेशन इन महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.
संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. आपण कुठेही अडलो, तरी आईला हाक मारतो. त्याचप्रमाणे जर आपल्याकडे संस्कृतचे ज्ञान असेल, तर आपल्याला कोणतीही भाषा समजून घेतांना अडचण येणार नाही. यामुळे आपण संस्कृतवर प्रभुत्व मिळवावे, अशी सूचनाही राज्यपाल यांनी उपस्थित कुलगुरु आणि शिक्षणतज्ञ यांना केली.
राज्यात एक शिक्षक पूर्णवेळ कार्यरत असलेल्या संस्थांना महाविद्यालय चालू करण्याची मान्यता दिली जाते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण कसे मिळणार ?, असा प्रश्नही कोश्यारी यांनी या वेळी व्यक्त केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात