विक्रेत्याने हिंदूंची क्षमा मागितली
भारतात प्रतिदिन देवतांच्या चित्रांचे विडंबन केले जाते. अशा प्रकारे वैध मार्गाने हिंदूंनी संघटितपणे विरोध केल्यास पुन्हा कोणीही विडंबन करण्यास धजावणार नाही !
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
नेवाडा (अमेरिका) : ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स भागातील बायरन बे येथे मुख्यालय असलेल्या ‘हार्ट माला सेक्रेड ज्वेलरी’ या दागिने विक्रेत्याने श्री गणेशाची प्रतिमा असणार्या पैंजणांची विक्री चालू केली होती. त्यावर हिंदूंनी निषेध नोंदवल्यानंतर विक्रेत्याने २४ घंट्यांच्या आत हिंदूंची क्षमा मागत पैंजण विक्रीतून मागे घेतले. हिंदूंचे येथील धार्मिक नेते राजन झेद यांनी विक्रेत्याकडे ‘विक्रीस अत्यंत अनुचित म्हणून पैंजणाची विक्री मागे घ्यावी आणि हिंदूंची क्षमा मागावी’, अशी मागणी केली होती.
हार्ट माला सेक्रेड ज्वेलरीचे संस्थापक, मालक आणि डिझायनर हैदी टर्नर यांनी राजन झेद यांना पाठवलेल्या संगणकीय पत्रामध्ये (इ-मेलमध्ये) म्हटले आहे की, मी हे उत्पादन माझ्या संकेतस्थळावरून त्वरित हटवले आहे आणि मी विकलेले दागिने परत मागवले आहेत. यापुढे असे पैंजण बनवले जाणार नाहीत. ते उत्पादन सिद्ध करण्याच्या माझ्या चुकीच्या कृतीमुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी क्षमा मागत आहे.
राजन झेद यांनी निवेदनाद्वारे सल्ला दिला आहे की, हार्ट माला सेक्रेड ज्वेलरी आणि इतर आस्थापनांनी स्वतःच्या वरिष्ठ अधिकार्यांना धार्मिक अन् सांस्कृतिक संवेदनशीलतेच्या प्रशिक्षणासाठी माझ्याकडे पाठवावे. जेणेकरून नवीन उत्पादने सादर करतांना किंवा विज्ञापन मोहीम चालू करतांना त्यांना ग्राहक आणि समुदायाच्या भावना समजतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात