शनैश्वर देवस्थान समितीवर कारवाईचा प्रश्नच नसल्याची स्पष्टोक्ती
मुंबई : शनि मंदिरात सर्व स्त्री-पुरुषांना प्रवेश खुला असून चौथर्यावर जाण्यास बंदी आहे. तसा ठराव वर्ष २०११ मध्ये देवस्थान समितीने केला आहे. चौथर्यावर गर्दी झाल्यास संभाव्य चेंगराचेंगरीचा धोका टाळण्यासाठी चौथर्यावर प्रवेश नाही. त्यामुळे शनैश्वर देवस्थान समितीवर कारवाईचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले. या संदर्भातील तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार श्रीमती विद्या चव्हाण, हेमंत टकले, आनंद ठाकूर, नरेंद्र पाटील आणि किरण पावसकर यांनी विचारला होता.
विद्या चव्हाण यांनी या संदर्भातील लेखी प्रश्न विचारला की, शबरीमला मंदिरातील प्रवेशाच्या संदर्भातील याचिकेच्या सुनावणीच्या वेळी राज्यघटनेत असा अधिकार दिला नसेल, तर प्रवेश रोखता येणार नाही, असा आदेश ११ जानेवारी २०१६ या दिवशी उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे शनैश्वर देवस्थान समितीवर कोणती कारवाई शासन करणार आहे ?
या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखी उत्तर देतांना म्हटले आहे की,
१. श्री शनिदेवाच्या चौथर्यावर स्त्री आणि पुरुष यांना जाता येणार नाही, असा ठराव विश्वस्त मंडळाने ९ फेब्रुवारी २०११ या दिवशी पारीत केला आहे.
२. असा ठराव संमत करण्याचे कारण असे की, भाविक ओल्या वस्त्राने दर्शन घेतांना शनिमूर्तीस दोन्ही हातांनी स्पर्श करून संपूर्ण भार मूर्तीवर टाकतात, तसेच सोबत आणलेले पूजा साहित्य लोखंडी नाल, यंत्र, अंगठी इत्यादी शनिमूर्तीस घासतात. त्यामुळे मूर्तीची मोठ्या प्रमाणावर झीज होत आहे.
३. भाविक अधिक वेळ मूर्तीजवळ थांबत असल्याने चौथर्यावर गर्दी होते आणि जे भाविक चौथर्याखालून दर्शन घेऊ इच्छितात, त्यांना मूर्ती दिसत नाही. तसेच शनिमूर्तीवर तेलाचा अभिषेक करण्यात येत असल्याने, चौथर्यावरील फरशीवर तेल सांडलेले असते. त्यामुळे भाविक पाय घसरून पडण्याची शक्यता असते.
४. अशा प्रकारे संभाव्य चेंगराचेंगरी रोखण्यासाठी आणि सर्वांना सुलभपणे दर्शन घेणे सोयीचे होण्यासाठी सर्व भाविकांना शनिदेवाच्या चौथर्याखालून दर्शन चालू करून शनिदेवाच्या पूजेसाठी न्यासाचे अधिकृत पुजारी चौथर्यावर थांबून भाविकांनी आणलेले तेल, पूजा साहित्य घेऊन मूर्तीस चढवतील, असा ठराव विश्वस्त मंडळाने केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात