रामजन्मभूमीच्या निकालानंतर पुरी पिठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे प्रतिपादन
भुवनेश्वर (ओडिशा) : सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर भूमी देणे हे दुर्दैवी आहे. भविष्यात ही भूमी आतंकवाद्यांच्या मुख्य ठिकाणामध्ये रूपांतरित होईल, ‘देशहिताच्या दृष्टीने हे धोकादायक सिद्ध होईल आणि यामुळे आगामी काळामध्ये अशांतता निर्माण होईल’, असे प्रतिपादन पुरी पिठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी रामजन्मभूमीच्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केले आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दैनिक जागरणने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी मांडलेली सूत्रे
१. आपली भूमी आतंकवाद्यांना देत आहोत !
हिंदू आणि मुसलमान शांततेत राहावेत म्हणूनच भारत अन् पाकिस्तान वेगवेगळे झाले. प्रत्यक्षात या दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता नाही. पाकिस्तान आतंकवाद्यांचा केंद्रबिंदू झाला आहे, असे स्वतः पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मान्य केले आहे. असे असतांना आपण आपली भूमी आतंकवाद्यांना देत आहोत.
२. अयोध्या दुसरी मक्का बनेल !
सुन्नी वक्फ बोर्डाला देण्यात येणार्या ५ एकर भूमीवर मशीद बनवली गेली, तर अयोध्या आणखी एक मक्का बनेल. आतंकवाद्यांचे प्रवेशद्वार होईल आणि उत्तरप्रदेश पाकमध्ये रूपांतरित होईल.
३. मंदिर आणि मशीद बनवायची होती, तर आधीच का बनवली नाही ?
जर एकाच भूमीवर मंदिर आणि मशीद बनवायची होती, तर ती आधीच का बनवण्यात आली नाही ? नरसिंह राव आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात समान निर्णय घेण्यात आला होता. यावर आम्ही सहमती दाखवली नव्हती. त्यामुळे हा निर्णय रहित करण्यात आला होता.
संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रहित करावा !
राजकीय नेते त्यांचे हित साधण्यासाठी धर्मगुरु बनवत आहेत आणि त्यांच्या मतांच्या आधारे स्वहित साधत आहेत. अशा वेळी संसदेत विशेष अधिवेशन बोलावून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रहित करावा, अशी मागणी शंकराचार्यांनी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात