प्रियोळ, म्हार्दोळ येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
फोंडा : हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणे आणि हिंदूंना जागृत करणे, हे कार्य देशभरात आतापर्यंत झालेल्या सहस्रांहून अधिक हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. परिणामस्वरूप ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय राष्ट्रीय स्तरावर चर्चिला जात आहे. हिंदूंना भेडसावणार्या समस्या, काश्मीरची समस्या, धर्मांतर, गोहत्या, समान नागरी कायदा, मंदिरांवर होणारे आघात आदी अनेक विषय सभांच्या माध्यमातून मांडल्यानंतर या समस्यांची नोंद आज शासन घेत आहे. ३७० कलम रहित झाले आहे आणि अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यापुढे प्रभु श्रीरामाच्या कृपेने रामराज्याचा अर्थात् हिंदु राष्ट्र स्थापनेचा मार्गही मोकळा होईल, अशी आमची श्रद्धा आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने श्री बेताळ मंदिर सभागृह, प्रियोळ, म्हार्दोळ येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त श्री. गोविंद चोडणकर बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांची उपस्थिती होती.
सभेला श्री गणेशाचा श्लोक म्हणून आणि शंखनाद करून प्रारंभ झाला. प्रारंभी विविधा नागरी पतसंस्थेचे श्री. विशांत गुरव यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांचे, तर सौ. स्मिता राया नाईक यांनी सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्री. गोविंद चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘काही ख्रिस्ती मिशिनरी, बिलिव्हर्सवाले, ‘लव्ह जिहाद’चे धंदे करणारे मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर घडवून आणत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन आता धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी केली पाहिजे.’’
सभेचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सौ. शांभवी दामले यांनी केले.
आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक ! – सौ. शुभा सावंत
सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत ‘हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आणि सामर्थ्य’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, ‘‘हिंदु धर्म प्रत्येकाला संकट सहन करण्याचे, तसेच आनंदी जीवन जगण्याविषयी शिकवतो. आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे. नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभावदोष निर्मूलन, अहंनिर्मूलन आणि भावजागृती यांसाठी प्रयत्न अशी अष्टांग साधना करून आपण श्रीगुरूंचे मन जिंकले पाहिजे.’’
सभेला उपस्थित महनीय व्यक्ती
वेलींग-प्रियोळ-कुंकळ्ळे ग्रामपंचायतीचे पंचसदस्य श्री. मंगेश गावडे आणि पंचसदस्य श्री. मंगलदास प्रियोळकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
सभा यशस्वी होण्यासाठी लाभले सहकार्य
श्री बेताळ ग्रामपंचिष्ठ देवस्थान, गावठाण, प्रियोळचे सर्वश्री अनिल कोरडे, अशोक गुरव, विशांत गुरव, संतोष गुरव, सौ. शर्मिला गुरव, सौ. माधवी गुरव, सौ. मिरा गुरव, सौ. रंजना गुरव आदींनी हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले.
क्षणचित्रे
१. सभेनंतर स्थानिक हिंदुत्वनिष्ठांसाठी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या हेतूने पुढील दिशा निश्चित करण्यासाठी आयोजित केलेल्या एका आढावा बैठकीत उपस्थितांना गावात धर्मशिक्षणवर्ग आणि बालसंस्कारवर्ग प्रारंभ करण्याची विनंती केली. या वर्गांसाठी आवश्यक अनुज्ञप्ती काढण्याची सिद्धताही ग्रामस्थांनी दर्शवली.
२. सभा स्थळाजवळ श्रीमती सविता नाईक (वय ७० वर्षे) या राहतात. सभेला उपस्थित राहता यावे, यासाठी त्यांनी त्यांचे वैयक्तिक काम रहित करून सभेला उपस्थिती लावली.
३. सभेला प्रारंभ होण्याच्या १५ मिनिटांपूर्वीच ग्रामस्थ सभास्थळी उपस्थित होते.
४. सभा स्थळापासून ४० कि.मी. अंतरावर राहणारे शिरसई येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. राजेश चोडणकर यांनी सभेला आर्वजून उपस्थिती लावली.