रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाचे प्रकरण
राममंदिर पाडून बाबरी ढाचा बांधला गेला. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असतांनाही धर्मांध ते स्वीकारत नाहीत. यावरून त्यांच्यातील कट्टरता दिसून येते ! अशांशी बंधूभावाने वागण्याचा फुकाचा सल्ला धर्मनिरपेक्षतावाल्यांकडून दिला जातो, हे संतापजनक !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : रामजन्मभूमी खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ पुनर्विचार याचिका प्रविष्ट करणार आहे. बोर्डाच्या झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या खटल्यामध्ये हा बोर्ड पक्षकार नव्हता. तरीही त्याने याचिका करण्याचा निर्णंय घेतला आहे. बोर्डाच्या बैठकीमध्ये सुन्नी वक्फ बोर्डाचे अधिवक्ता जफरयाब जिलानी, एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी आदी सहभागी झाले होते.
१. बोर्डाचे अध्यक्ष कासिम रसूल इलियास यांनी म्हटले की, बाबरी मशिदीच्या बदल्यात दुसर्या ठिकाणी ५ एकर भूमी देणे आम्हाला मान्य नाही. मुसलमान हे स्वीकारणार नाहीत. न्यायहिताच्या दृष्टीने आम्हाला बाबरी मशिदीचीच जागा दिली पाहिजे. आम्ही दुसरी जागा मिळवण्यासाठी न्यायालयात गेलोे नव्हतो, तर आम्हाला त्याच ठिकाणी जागा हवी, ज्या ठिकाणी बाबरी मशीद होती.
२. बैठकीपूर्वी मौलना महमूद मदनी यांनी म्हटले होते की, आम्ही पुनर्विचार याचिका प्रविष्ट करणार आहोत. याचा निकाल काय असेल, हे आम्हाला ठाऊक आहे. तरीही आम्ही आमचा अधिकार बजावणार आहोत.
हा वाद संपवला पाहिजे ! – बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी
बोर्डाच्या निर्णयावर बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी म्हणाले की, हा वाद आता येथेच संपवला पाहिजे. आता निर्णय आला आहे आणि तो स्वीकारलाही आहे. आता त्याच्या पुढे जायला नको. आम्ही भारताचे मुसलमान आहोत आणि भारताच्या राज्यघटनेला मानतो. मुसलमानांचे ५-६ पक्षकार होते. ते आता काय करत आहेत, याच्याशी माझे देणे-घेणे नाही.
पुनर्विचार याचिका करू नये ! – काँग्रेस
काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पुनर्विचार याचिका करू नये’, असे म्हटले आहे. ‘न्यायालयाने निकाल दिला आहे, तो सर्वांनी मान्य करावा’, असे अल्वी यांनी म्हटले.
पुन्हा हिंदूंच्या बाजूनेच निर्णय मिळेल ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन
मुसलमानांमधील काही जणांना या देशात शांतता नको आहे. तरीही ते याचिका करू इच्छित असतील, तर त्यांनी ती करावीच. यामुळे आम्हाला आनंदच होईल. असे केल्याने पुन्हा एकदा असाच (हिंदूंच्या बाजूने) निकाल लागेल. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सत्य लक्षात येईल. मी सांगू इच्छितो की, अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राममंदिरच बनेल, अशी प्रतिक्रिया रामजन्मभूमी खटल्यातील हिंदु महासभेचे अधिवक्ता पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीच्या चर्चासत्राच्या वेळी व्यक्त केली.
आमची ४० सहस्र मंदिरे परत द्या ! – अभिनेत्री कोयना मित्रा
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला रामजन्मभूमी खटल्याचा निकाल हिंदु पक्षकारांच्या बाजूने देतांना ‘मशिदीसाठी पर्यायी ५ एकरची जागा द्या’, असा आदेश सरकारला दिला होता. या निकालावर ‘एम्आयएम्’ पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली होती, तसेच त्यांनी ‘मला माझी मशीद परत हवी आहे’, असे ‘ट्वीट’ केले होते. त्यावर विरोध म्हणून ‘ट्विटर’वर ‘ओवैसी भारत छोड़ो !’ हा ट्रेंड चालू आहे. यामध्ये अभिनेत्री कोयना मित्रा यांनी ओवैसी यांना खडेबोल सुनावतांना ‘आमची ४० सहस्र मंदिरे परत द्या !’ असे ‘ट्वीट’ केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात