मुंबई : श्रीराम हे राष्ट्रपुरुष असून रामजन्मभूमी हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिर हे सरकारी मंदिर न होता हिंदु समाज आणि साधू-संत यांच्याकडे राहिले पाहिजे, अशी भूमिका विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री. मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. शीव (सायन) कोळीवाडा येथे स्व. अशोक सिंघल रुग्ण सेवासदनाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ते मुंबईत आले होते.
या वेळी श्री. मिलिंद परांडे म्हणाले की, देशातील कोट्यवधी लोकांच्या घरात राममंदिराचे जे संकल्पचित्र पोचले आहे, त्याप्रमाणेच प्रत्यक्षातील राममंदिर उभे राहायला हवे. म. गांधी यांनी सोमनाथ मंदिराच्या सूत्रावरून मुसलमान समाजाला ‘विदेशी आक्रमकांशी नाते न ठेवता येथील राष्ट्रपुरुषांशी स्वत:ला जोडून घ्यावे’, असा उपदेश दिला होता. तेच सूत्र श्रीरामजन्मभूमीला लागू होते. बाबर हा विदेशी आक्रमक होता. सध्या रामजन्मभूमीवरील या प्रस्तावित मंदिरासाठी कुठलेही निधीसंकलन चालू नाही. या मंदिरासाठी कोट्यवधी लोकांनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात जो निधी दिला, त्यातून मंदिराचे दगडी स्तंभ आणि अन्य भागांचे कोरीव काम चालू आहे. हे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे.
शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण हे हिंदूंच्या आस्था तोडण्यासाठी उभे केले गेले असण्याची शक्यता !
श्री. मिलिंद परांडे पुढे म्हणाले, ‘‘केरळचे साम्यवादी नेते नंबुद्रीपाद यांनी ५० वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहे की, केरळमधे साम्यवाद वाढवायचा असेल, तर शबरीमला येथील अय्यप्पा मंदिराच्या परंपरा तोडाव्या लागतील. अगदी असेच मत ख्रिस्ती मिशनर्यांनी केरळमध्ये धर्मप्रसार करतांना नोंदवले आहे. यावरून शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण हे हिंदूंच्या आस्था तोडण्यासाठी उभे केले गेले असण्याची शक्यता आहे. वर्षाला साडेपाच ते ६ कोटी भाविक शबरीमला मंदिरात येतात. हा त्यांच्या आस्थेचा प्रश्न आहे. शबरीमला मंदिर सोडून अन्य कुठल्याही अय्यप्पा मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदी नाही. हा लिंगभेदाचा विषयच नसून एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. मागील वर्षभरात पोलिसांनी शबरीमला येथे हिंदु भाविकांवर भीषण अत्याचार केले आहेत. ४० सहस्र हिंदूंच्या विरोधात खोट्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. महिला भाविकांवरही पोलिसांनी हात उगारला आहे. केरळ शासनाने हे हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवले पाहिजेत.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात