पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदुत्वनिष्ठांचे आवाहन
पुणे : निवडणुकीमध्ये समस्त हिंदूंनी शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत दिले. त्यानंतर कोणतेही शासन स्थापन न झाल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. नुकतेच वारकर्यांच्या दिंडीमध्ये सुरक्षेअभावी वारकर्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात हिंदूंवर झालेला अनन्वित अन्याय लक्षात घेता हिंदुत्वाची विचारसरणी असलेले शासन महाराष्ट्रात असायला हवे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी हिंदुत्वाचा विचार करून महाराष्ट्राला स्थिर शासन द्यावे अन् समस्त हिंदूंच्या भावना जोपासाव्यात, असे आवाहन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आले. पुण्यातील गांजवे चौक येथील पत्रकार भवनात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी समस्त हिंदू आघाडी, हिंदु महासभा, हिंदु राष्ट्र सेना, हिंदु एकता आंदोलन, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद, राजे शिवराय प्रतिष्ठान यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवरांनी हिंदुत्वनिष्ठांची भूमिका मांडत त्यांचे मत व्यक्त केले.
हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदुत्व विचारसरणीचे शासनच हवे ! – एकबोटे
शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुसलमान आरक्षण, शिवजयंती तिथीप्रमाणे कि दिनांकाप्रमाणे साजरी करावी ?, काँग्रेसने मांडलेला ‘भगवा आतंकवाद’ असे अनेक टोकाचे मतभेद आहेत.
ते बाजूला सारून आघाडी करणे, हे हिंदुत्वनिष्ठांसाठी खेदजनक ठरेल. शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकाळात अनेक समाधानकारक कामे झाली आहेत. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुनर्स्थापित करणे, प्रतापगडावरील अवैध बांधकाम हटवणे अशा अनेक सूत्रांवर काम करायचे आहे. ते पूर्ण करण्यासाठी हिंदुत्व विचारसरणीचे शासनच हवे. अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा या दोन्ही पक्षांनी जपायला हवा. पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचेही हिंदुत्वाच्या या भूमिकेविषयी आम्हाला आशीर्वचन लाभले आहे.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यावे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्रात सत्तास्थापनेत निर्माण झालेल्या समस्येविषयी यापूर्वीच प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रातील जनतेने महाजनादेशाला कौल दिला आहे. त्या भूमिकेतूनच महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यावे. जेव्हा पुण्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र येऊन भूमिका मांडतात, तेव्हा महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश त्याची नोंद घेतो. या पत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदूंच्या भावनांचा विचार नक्की करतील, अशी हिंदुत्वनिष्ठांना आशा आहे.
काँग्रेस आणि (अ)राष्ट्रवादी काँग्रेस यांना पुन्हा सत्तेत घेऊ नये ! – समीर कुलकर्णी
आजपर्यंतच्या घटनांमध्ये काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात मोठी आतंकवादी आक्रमणे झाली. काँग्रेसचे सनातन धर्माविषयी विकृती पसरवण्याचे षड्यंत्र सर्वांसमोर आहेच. प्रत्येक वेळी देशद्रोह्यांचे समर्थन करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत केले. अशा पक्षांना आपल्यासह घेऊन शासन स्थापन करणे अनाकलनीय आहे; म्हणूनच काँग्रेस आणि (अ)राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सत्तेत घेऊ नये.
हिंदुत्वनिष्ठ विचारांचे शासनच नक्षलवादी कारवायांना रोखू शकेल ! – सचिन पाटील, हिंदु राष्ट्र सेना
नुकतेच कथित विचारवंत मानल्या जाणार्या काही व्यक्ती नक्षलवादी कारवायांमध्ये कसे सहभागी आहेत, हे उघडकीस आले. या विचारांना खतपाणी घालणारे हिंदुद्रोही शासन पुन्हा उभे राहिल्यास नक्षलवादाला पुन्हा प्रोत्साहन दिले जाईल. एक देहलीत आहे, तसे उद्या महाराष्ट्रात ‘जे.एन्.यू.’ उभे राहायला नको. अशा सर्व देशविघातक कारवायांना शिवसेना-भाजप यांचे हिंदुत्वाच्या सूत्रांवर कार्य करणारे शासनच रोखू शकेल.