महाराष्ट्र सरकारने संरक्षित केलेल्या गडावरच अनधिकृत काम !
ख्रिस्ती स्मशानभूमीसह चित्रपटाचा देखावा काढण्यास शिवप्रेमींनी भाग पाडले !
पुरातत्व खात्याकडून ५० सहस्र रुपये दंड, तसेच प्रतिदिन ५० सहस्र रुपये शुल्क भरण्याचा आदेश !
- ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी तात्काळ कृती करणार्या शिवप्रेमींचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी याचा आदर्श घेऊन देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी पदोपदी दक्ष राहणे आवश्यक !
- गड-किल्ले हा हिंदूंच्या पराक्रमी इतिहासाचा वैभवशाली ठेवा आहे. त्यामुळे अशा ठिकाणी चित्रीकरण करण्यावर तात्काळ बंदीच हवी !
वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथे महाराष्ट्र सरकारने संरक्षित केलेल्या यशवंतगड किल्ल्यात गोवा राज्यातील ‘फोकस फिल्मस् एन्टरटेंन्मेट’ या आस्थापनाच्या माध्यमातून एका तेलगु चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. याविषयी शिवप्रेमींना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धडक देत संबंधितांना खडसावले. या वेळी कोणत्याही प्रकारची शासकीय अनुमती न घेता चित्रीकरण चालू असल्याचे उघड झाले. चित्रीकरणासाठी गडाच्या भिंतींना रंग फासून खिळे ठोकण्यात आले होते. तसेच ख्रिस्ती स्मशानभूमीच्या देखाव्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘क्रॉस’ उभे करण्यात आले होते. याविषयी पुरातत्व खात्याचे लक्ष वेधताच संबंधित आस्थापनाला ५० सहस्र रुपये दंड, तसेच चित्रीकरणासाठी प्रतिदिन ५० सहस्र रुपये शुल्क भरून चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला. (परराज्यातील एक आस्थापन महाराष्ट्रात येऊन राज्याची अस्मिता असलेल्या गड-किल्ल्यांवर अवैधरित्या काम करते, हेच संतापजनक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या घटनेतील काही प्रमुख सूत्रे…
१. यशवंतगडावर गेले काही दिवस एका चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. चित्रीकरणासाठी गडाच्या काही भागात ख्रिस्त्यांचे ‘क्रॉस’ उभे केले होते.
२. याविषयी समजल्यानंतर शिवप्रेमी, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, दुर्गवीर प्रतिष्ठान, तसेच ग्रामस्थ यांनी त्वरित चित्रीकरणस्थळी जाऊन संबंधित आस्थापनाच्या कर्मचार्यांना खडसावले, तसेच चित्रीकरणासाठी उभारलेला देखावा त्वरित काढून टाकण्यास सांगितले.
३. शिवप्रेमींच्या विरोधानंतर संबंधित आस्थापनाने देखावा काढून टाकला, तसेच ‘भिंतीवर टाकलेला रंग धुवून देऊन किल्ल्याची साफसफाई करू, देखाव्यासाठी ‘क्रॉस’ उभे करून उभारलेली स्मशानभूमी हटवू’, असे आश्वासन दिले. (शिवप्रेमींनी याविषयी आवाज उठवला नसता, तर हे ‘क्रॉस’ आहेत, ते तसेच ठेवून नंतर काहींनी ही ख्रिस्त्यांचीच भूमी आहे, असा दावा करून भूमी लाटण्याचा प्रयत्न कशावरून केला नसता ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. शिवप्रेमी तसेच ग्रामस्थ यांनी आस्थापनाला ‘चित्रीकरणाविषयी अनुमती आहे का ?’, असे विचारले असता, कोणतीही शासकीय अनुमती न घेता चित्रीकरण चालू असल्याचे लक्षात आले. (गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, हिंदूंच्या मिरवणुका, जाहीर सभा आदींसाठी हिंदूंना प्रत्येक वेळी शासकीय अनुमतीच्या नावाखाली आडकाठी आणणारे प्रशासन शासनाच्याच एका गडावर उघडउघड अनधिकृतरित्या काम चालू असतांना त्याविषयी अनभिज्ञ आहे, यावर कोण विश्वास ठेवेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
५. त्यामुळे शिवप्रेमींनी आस्थापनाला ‘चित्रपटाचे चित्रीकरण तात्काळ थांबवा आणि अनुमती आणल्यावरच चित्रीकरण चालू करू शकता’, असे सांगितले.
६. त्यानंतर शिवप्रेमींनी रत्नागिरी येथील पुरातत्व विभागाच्या कार्यालयात याविषयी तक्रार केली. तेव्हा पुरातत्व विभागाने या आस्थापनाला चित्रीकरण थांबवण्याचा आदेश दिला. (शिवप्रेमींनी याविषयी आवाज उठवला नसता, तर पुरातत्व विभाग गोव्यात म्हणतात तसे ‘सुशेगाद’ राहिला नसता कशावरून ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
७. शिवप्रेमींनी केलेली तक्रार आणि रत्नागिरी येथील पुरातत्व विभागाने चित्रीकरण थांबवण्याचा दिलेला आदेश यांची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाच्या ‘पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालया’ने या आस्थापनाला विनाअनुमती चित्रीकरण केल्याविषयी ५० सहस्र रुपये दंड ठोठावला, तसेच प्रतिदिन ५० सहस्र रुपये शुल्क आकारून अटी आणि शर्तींच्या अधीन राहून चित्रीकरण करण्यास अनुमती देण्याची रत्नागिरी पुरातत्व कार्यालयाला सूचना दिली. (शिवप्रेमींनी या गोष्टी लक्षात आणून दिल्या नसत्या तर, आज शासनाचा पर्यायाने देशाचा किती महसूल बुडाला असता ? तसेच शिवप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी हे प्रकार थांबवले नसते, तर अशा आस्थापनांचा उद्दामपणा पुढे वाढतच गेला असता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
८. मात्र या आदेशाकडे प्रशासकीय स्तरावरून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शिवप्रेमींनी करून याविषयी संताप व्यक्त केला आहे.
९. ‘गड-किल्ल्यांवर अशा पद्धतीने जर काही चुकीचे प्रकार होत असल्याचे लक्षात आले, तर सर्वांनी एकत्र येऊन अशा अपप्रकारांना तात्काळ आळा घालावा’, असे आवाहन या वेळी शिवप्रेमींनी केले.
पुरातत्व खात्याकडून फोकस फिल्म एंटरटेनमेंट यांना नोटीस
किल्ल्यावर विनाअनुमती चित्रीकरण केल्याविषयी साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, रत्नागिरी यांनी गोव्यातील वास्को येथील फोकस फिल्म एंटरटेनमेंटचे सनी नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीच्या प्रती पुरातत्व विभागाने संचालक, पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालये, मुंबई; तहसीलदार, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग; पोलीस निरीक्षक, वेंगुर्ला पोलीस ठाणे; सरपंच, रेडी, वेंगुर्ला, यांना पाठवल्या आहेत.
या नोटिसीत म्हटले आहे की,
१. यशवंतगड किल्ला हे पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक असून विभागाच्या नियंत्रणात आहे. आपल्याकडून सदरहू किल्ल्यात विनाअनुमती चित्रीकरण करण्यात येत असल्याचे ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ यांनी कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
२. आपणाकडून स्मारकाच्या ठिकाणी कब्रस्तान दाखवून स्मारकाची विटंबना करण्यात आली आहे. जो कोणी स्मारकाचा अवैधरित्या उपयोग करील त्यास महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराणवस्तूशास्त्रविषयक स्थळे अवशेष अधिनियम १९६० चा नियम १२ कलम ३३ अंतर्गत पोटकलम ४ अन्वये ३ मास मुदतीच्या कारावासाची शिक्षा किंवा दंड, अशी शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होतील.
३. आपणाकडून विनाअनुमती यशवंतगड किल्ल्यावर चित्रीकरण करून संरक्षित क्षेत्राचा गैरवापर करण्यात आला आहे. आपण केलेले कृत्य दायित्वशून्यतेचे आहे.
४. अधिनियम १६० मधील कलम ३३ भाग १ अन्वये संरक्षित क्षेत्राचा अवैधरित्या वापर करणे आणि नियम १९६२, अधिसूचना दिनांक १९/९/१९६२ भाग २ कलम ८ – संरक्षित क्षेत्रात विवक्षित कृत्य करणे या गुन्ह्यास दोषी समजून महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराणवस्तूशास्त्रविषयक स्थळे अवशेष अधिनियम १९६० भाग २ कलम
९ शास्ती अन्वये आपणास ५० सहस्र रुपये दंड आकारून याद्वारे समज देण्यात येत आहे. दंडाची रक्कम तात्काळ कार्यालयात भरणा करण्यात यावी.
५. यापुढे असे कोणतेही कृत्य केल्याचे निदर्शनास आल्यास आपणावर वरील नियमानुसार गुन्हा नोंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी, तसेच सेन्सॉर बोर्डाकडेसुद्धा (चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडेसुद्धा तक्रार करण्यात येईल.)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात