प्रत्येक धर्मप्रेमीलाच धर्मप्रसार करण्यासाठी सक्षम प्रसारमाध्यम (चॅनेल) बनावे लागेल ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर : हिंदु जनजागृती समिती हे समाजातील सर्व स्तरांमधील हिंदूंना एकत्र करण्यासाठी व्यापक असे एक व्यासपीठ आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हाच आमचा आदर्श आहे. यापुढील काळात आपल्याला असा हिंदु राष्ट्र संघटक अपेक्षित आहे, जो सक्षमपणे स्वत:च एक प्रसारमाध्यम (चॅनेल) बनून हिंदु धर्मप्रसार करेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. १७ आणि १८ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वडणगे येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे उपस्थित होते.
या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘कोणतेही कार्य करतांना साधना हेच आपले प्राधान्य हवे. साधनेचे बळ असेल, तर कठीण प्रसंगातही ईश्वर आपले रक्षण करतो.’’
या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता प्रकाश खोंद्रे म्हणाले, ‘‘माहितीच्या अधिकाराचा प्रभावी उपयोग करून हिंदु जनजागृती समितीने अनेकविध घोटाळे उघडकीस आणले. त्याचप्रकारे धर्मप्रेमींनीही तक्रार करणे, निवेदन देणे, जनहित याचिका, माहितीचा अधिकार वापरून लोकशाहीतील सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा दिला पाहिजे.’’
दोन दिवसीय कार्यशाळेत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्या दैवी गुणांचा परिचय, हिंदु राष्ट्र स्थापनेचे उपक्रम, स्वरक्षण प्रशिक्षण, स्वभावदोष निर्मूलन, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना यावर गटचर्चा यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
विशेष
१. सातारा, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मप्रेमी दोन दिवस सभागृहस्थळी निवासासाठी होते. त्यामुळे दोन दिवसांत कुटुंबभावना अनुभवता आली, असे अनेकांनी सांगितले.
२. ध्वनीक्षेपकावर बोलण्याचा कोणताही सराव नसतांना, तसेच यापूर्वी कधीही अनेकांसमोर बोलण्याची सवय नसतांना अनेक धर्मप्रेमींनी अभ्यासपूर्ण, उत्स्फूर्तपणे त्यांचे मनोगत व्यक्त केले. यात विशेषकरून महिला धर्मप्रेमी आघाडीवर होत्या. अनेकांचे मनोगत ऐकत राहावे असेच होते.
दीपावलीच्या काळात नांगनूर गावात ४६ सनातन आकाशकंदील लावणारे धर्मप्रेमी श्री. अमोल चेंडके
दीपावलीच्या काळात पुढाकार घेऊन नांगनूर गावात ४६ सनातन आकाशकंदील लावले. हा धर्मकार्यात लोकांचा सहभाग वाढत असल्याची पोचपावती आहे, असे धर्मप्रेमी श्री. अमोल चेंडके यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले.
हिंदु राष्ट्र या विषयावर काही धर्मप्रेमींनी मनोगत व्यक्त केले, तसेच धर्मकार्य करतांना केलेल्या विशेष प्रयत्नांविषयी अनुभवकथन केले
१. श्री. तानाजी वातकर, सांगरूळ – हिंदूंना धर्मविषयक शिक्षण दिले पाहिजे. प्रत्येक हिंदू जर धर्माच्या दृष्टीने सक्षम झाला, तर सर्वत्र जागृती होण्यास वेळ लागणार नाही.
२. श्री. संभाजी कदम, सातारा – व्यष्टी कार्याला समष्टीची जोड देत दैनिक सनातन प्रभात घरोघरी पोेचवण्यासाठी प्रयत्न केले. सनातन प्रभातचे वर्गणीदार वाढवण्यासाठी प्रयत्न केले. यातील काही वर्गणीदार ६० किलोमीटर अंतरापर्यंतचे आहेत.
३. सौ. सरिता पाटील, शिरोली – धर्मकार्य, तसेच नामजप-सेवा चालू केल्यावर घरात मुलांमध्ये पालट दिसून आला. आता पूर्वीपेक्षा पुष्कळ चांगले वाटत आहे.
४. श्री. अमोल चेंडके, नांगनूर – देवच माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, असा भाव ठेवल्याने सर्व सहजगत्या पार पडते. नियोजनपूर्वक कार्य केल्यास त्यात यश मिळतेच, हे हिंदु जनजागृती समितीमुळे शिकायला मिळाले. धर्मकार्यात मोठ्या प्रमाणात लोक जोडले जात असून गावात ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोक वेळप्रसंगी धर्माच्या बाजूने उभे राहातात.
समारोपसत्रात काही धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत
१. श्री. विजय लोहार, सातारा – समाजात जाऊन कोणताही विषय प्रस्तुत करणे, तसेच खंडण करणे यांसाठी आता आत्मविश्वास आला. कार्यशाळेत स्वत:चे दोष कसे शोधावे तेही कळाले. याचा निश्चित लाभ होईल.
२. श्री. अक्षय बिसुरे, सातारा – प्रेमभाव, उत्तम व्यवस्था असलेला कार्यक्रम पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला. कार्यशाळेत नेमके धर्मशास्त्र समजले. याचा निश्चित लाभ होईल. प्रत्येक रविवारी आम्ही काही धर्मप्रेमी एकत्र येऊन ‘श्रीराम जय राम जय जय राम’, असा नामजप करतो.
३. श्री. रणजित गोळेे, केर्ले – कार्यशाळेत संयोजन, संघटन शिकायला मिळाले. हिंदूंना ‘हिंदू’ म्हणून जागृत करण्याचे मोठे सामर्थ्य हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात आहे.