धर्मपरंपरा जपण्यासाठी प्रयत्न करणार्या श्री शनिशिंगणापूर ग्रामस्थांचे अभिनंदन !
नगर : गुढीपाडव्याला करण्यात येणारा गंगाजलाभिषेक श्री शनिदेवाच्या चौथर्याखालून करावा, असा श्री शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा प्रस्ताव श्री शनिशिंगणापूर ग्रामस्थांनी ७ एप्रिल या दिवशी अमान्य केला होता. देवस्थानच्या विश्वस्तांचा विरोध डावलत गुढीपाडव्याच्या दिवशी, म्हणजेच ८ एप्रिल या दिवशी तालुक्यातील ३०० हून अधिक युवकांनी रूढीपरंपरेनुसार श्री शनिदेवाला गंगाजलाभिषेक केला. सदर युवकांनी गंगा आणि गोदावरी या नद्यांचे पाणी कावडीने आणून चौथर्यावर जाऊनच अभिषेक केला.
१. गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिदेवाच्या चौथर्यावर जाऊन श्री शनिदेवाला गंगाजलाभिषेक करण्याची परंपरा ही गेल्या ४०० वर्षांपासून चालू आहे.
२. ८ एप्रिल या दिवशी तालुक्यातील प्रत्येक गावातून युवकांनी कावडीने गंगा आणि गोदावरी या नद्यांचे पाणी आणले. सकाळी ११ ते १२ या वेळेत श्री शनिदेवाला हा गंगाजलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्री शनिदेवाची प्रथेप्रमाणे होणारी आरती झाली.
३. श्री शनिशिंगणापूरचे सरपंच श्री. बाळासाहेब बानकर यांनी सांगितले की, गुढीपाडव्याची ही परंपरा प्राचीन आहे. आम्ही परंपरा पाळली असून येथे कोणतीही चुकीची कृती केलेली नाही. त्यामुळे कोणीही विरोध करण्याचा प्रश्न येत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात