Menu Close

दादर (मुंबई) येथे दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची संतप्त निदर्शने !

मुंबई – 20 डिसेंबरला प्रदर्शित होणार्‍या दबंग 3 या हिंदी चित्रपटात साधूंना गॉगल घालून व हातात गिटार घेऊन हिडिस अन् आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना दाखवले आहे. देवतांचाही अवमान करण्यात आला आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतरही नाचणारे साधू खोटे असल्याचे सांगत सलमान खान यांनी चित्रपटातील सदर दृश्याचे समर्थन केले आहे. असे असेल तर सलमान खान यांनी खोटे मुल्ला-मौलवी आणि फादर-बिशप यांना गिटार घेऊन आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना दाखवावे ! हे जर ते करू शकणार नसतील, तर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन आम्ही कदापी सहन करणार नाही. चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळला नाही, तर ‘दबंग ३’ वर बहिष्कार घालण्यात येईल, अशा इशारा समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दादर येथील आंदोलनाच्या वेळी दिला.

दबंग ३ चित्रपटातून हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या अवमानाच्या विरोधात 8 डिसेंबर रोजी दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाजवळील स्वामी नारायण मंदिराजवळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनांनी हा निर्णय घेतला. या आंदोलनात हिंदू राष्ट्र सेना, बजरंगदल, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, वज्रदल, हिंदु जनजागृती समिती, शिवपुत्र प्रतिष्ठान, श्रीराम-गणेश मित्रमंडळ (धारावी), सनातन संस्था, रणरागिणी शाखा आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या आंदोलनात धार्मिक तेढ निर्माण करणारा दबंग 3 बंद करा, हिंदु धर्माचा अवमान करणार्‍या सलमान खान याचा धिक्कार असो, अशा उत्स्फूर्त घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. हातामध्ये फलक धरून धर्माभिमानी या आंदोलनात सहभागी झाले होते. सेन्सॉर बोर्डाने दबंग ३ चित्रपटातून होणारे हिंदूंच्या श्रद्धास्थांनाचे, तसेच भारतीय संस्कृतीचे केले गेलेल्या विडंबनाचे प्रसंग तात्काळ काढून टाकावेत, तोवर चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी आंदोलनात सहभागी हिंदू धर्मप्रेमींनी केली.

धार्मिक भावना जपल्या जाव्यात म्हणून सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या हिंदूंना प्रसिद्धीसाठी आंदोलन चालू आहे, असे म्हणणार्‍या सलमान खान यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. हिंदूंनी संपूर्ण चित्रपटाला विरोध केलेला नाही. तर धार्मिक भावना दुखवणारा आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी केली आहे; मात्र हिंदूंना भावनांची अशी अवहेलना जर सलमान खान करणार असतील, तर समस्त हिंदूंना या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत आहोत, असे हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी सांगितले.

दबंग ३ चित्रपटाविरोधात पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सेन्सॉर बोर्ड निर्मात्यांच्या हातातील बाहुले; आक्षेपार्ह प्रसंग न वगळल्यास चित्रपटाविरोधात आंदोलन करू ! – हिंदु जनजागृती समिती

दबंग ३ या आगामी चित्रपटात हिंदु साधूंना एका गाण्यात हिडीसपणे नाचतांना, गिटार वाजवताना दाखवले आहे. गाण्याच्या चालीवर साधूंना त्यांच्या जटा उडवत ठेका धरतांना दाखवले आहे. तसेच गाण्याच्या तालावरच श्रीकृष्ण, श्रीराम आणि शिव यांच्या वेशातील व्यक्ती सलमान खानला आशीर्वाद देतांनाही दाखवले आहे. ही दृश्ये अत्यंत निंदनीय असून हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करणारी आहेत. ती चित्रपटातून वगळली गेली पाहिजेत. यासाठी आम्ही सेन्सॉर बोर्डाकडेही निवेदन दिले आहे; मात्र व्यक्तीस्वातंत्र्य आणि कलास्वातंत्र्याच्या नावाखाली नेहमीच सेन्सॉर बोर्ड बोटचेपी भूमिका घेते. सध्याचे सेन्सॉर बोर्ड हे निर्मात्यांच्या हातातील बाहुले बनले असून ते काही करतील, अशी स्थिती नाही. त्यामुळे आम्ही या चित्रपटाच्या विरोधात कलम २९५ अ नुसार धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली आहे. जर निर्मात्यांनी किंवा सेन्सॉर बोर्डाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी दृश्ये यातून वगळली नाहीत, तर हिंदु समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी या वेळी दिला.

पुणे येथील डेक्कन पोलीस ठाणे येथे दिलेल्या या तक्रारीत सलमान खान फिल्म्स, अरबाज खान प्रोडक्शन्स, निर्माता सलमान खान, अरबाज खान, निखिल द्विवेदी आणि दिग्दर्शक प्रभुदेवा यांच्यावर भारतीय दंड संहिता २९५ अ या कलमानुसार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा नोंदवावा, असे म्हटले आहे. या वेळी अधिवक्ता सत्येंद्र मुळे हेही उपस्थित होते. या वेळी पोलिसांनी श्री. पराग गोखले आणि अधिवक्ता सत्येंद्र मुळे यांच्याशी याप्रकरणी सविस्तर चर्चा केली.

सध्या चित्रपटसृष्टीमध्ये चांगली पटकथा आणि चांगले चित्रण करून चित्रपट बनवणे, असे न होता हेतूतः चित्रपटात वादग्रस्त प्रसंग दाखवून चित्रपटाला पूर्वप्रसिद्धी मिळवण्याचा प्रघातच पडला आहे. कोणीही येतो आणि हिंदु देवता, संत, साधू आदींची टिंगल करतो. ही हिंमत मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांच्याबाबत कोणी करू धजावत नाही. जर तसे केले, तर काय होईल, याची त्यांना कल्पना असते. चित्रपटाच्या माध्यमातून कोणत्याही धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावणारे चित्रण केले जाऊ नये, यासाठी कायदा करण्याची, तसेच सेन्सॉर बोर्डामध्येही धार्मिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीची नियुक्तीही करण्याची आवश्यकता असल्याचेही श्री. गोखले यांनी या वेळी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *