Menu Close

जानेवारी २०२० मधे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभांचा वृत्तांत

तेलंगण राज्यातील मानकोंडुर, पेदापल्ली आणि लिंगंपेट येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांतून हिंदूंमध्ये व्यापक धर्मजागृती

तेलंगण : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील मानकोंडुर, पेदापल्ली आणि लिंगंपेट या भागात डिसेंबर २०१९ या मासात हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाल्या. या सभांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ आणि सनातन संस्थेच्या सौ. विनुता शेट्टी यांनी ‘धर्मशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर उद्बोधक विचार मांडले.

१. मानकोंडुर (जिल्हा करीमनगर)

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून श्री. चेतन गाडी, श्री. कोंडपाक आचार्युलू आणि सौ. विनुता शेट्टी

करीमनगर जिल्ह्यातील मानकोंडुर येथे ७  डिसेंबर २०१९ या दिवशी झालेल्या सभेत श्री. चेतन गाडी म्हणाले, ‘‘करीमनगरच्या बाजूच्या शहरातील मंदिरातील एका पुजार्‍याने मशिदीवरील भोंग्याच्या आवाज न्यून करण्यास सांगितल्याच्या रागातून एका धर्मांधाने या पुजार्‍यावर आक्रमण केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सरकारने या धर्मांधाला माथेफिरू ठरवून सोडून दिले. यालाच धर्मनिरपेक्षता म्हणायची का ? हिंदूंना न्याय केवळ हिंदु राष्ट्रातच मिळेल. यासाठी सर्वांनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. ’’

मानकोंडुर येथील सभेला उपस्थित असलेले धर्मप्रेमी हिंदू

क्षणचित्र

मानकोंडुर येथील मंडळ निरीक्षक श्री. संतोष कुमार यांनी सभेत स्वयंस्फूर्तीने विचार मांडतांना ‘भाग्यनगरमध्ये नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे स्त्रियांनी कशी सावधगिरी बाळगली पाहिजे’, याविषयी माहिती दिली.

२. पेदापल्ली

पेदापल्ली : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १५ डिसेंबरला सायंकाळी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत येथील ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष श्री. कोंडपाक श्रीनिवास आचार्युलू, हिंदु जनजागृती समितीचे तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी आणि सनातन संस्थेच्या सौ. विनुता शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. श्री. आचार्युलू मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘हिंदूंना धर्माचरणाविषयी सांगितले, तरी ते कृतीत आणत नाहीत. आई-वडिलांनी मुलांना धर्माचरणाविषयी शिकवले पाहिजे. सध्याची मुले पाश्‍चात्त्य विकृतीचे अंधानुकरण करत असल्यामुळे ती अशा विकृतीच्या अधीन झाली आहेत. मुलांच्या अशा वागणुकीला त्यांचे आई-वडीलही विरोध करत नाहीत. आपला धर्म विश्‍वात सर्वश्रेष्ठ आहे. आपण आपल्या धर्माविषयी सर्वांना माहिती करून दिली पाहिजे.’’

क्षणचित्रे

१. सभेनंतर झालेल्या धर्मप्रेमींच्या बैठकीत एका धर्मप्रेमीने त्यांच्या भागात हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याची मागणी केली.

२. महाविद्यालयातील एका प्राध्यापकांनी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सिद्धता दर्शवली.

३. लिंगंपेट (जिल्हा सिरसिल्ला)

लिंगंपेट येथे २२ डिसेंबरला झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभेची सर्व सिद्धता गावातील धर्माभिमानी हिंदूंनी केली होती. या सभेचा प्रचार सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) आणि बैठकांद्वारे करण्यात आला होता.

मुंबईतील परळ आणि मुलुंड येथे, तर नवी मुंबईतील तुर्भे आणि वाशी येथे घुमला हिंदु एकतेचा आवाज

मुंबई : धर्मांतर, लव्ह जिहाद, लँड जिहाद, मूर्तीभंजन यांसारख्या समस्यांनी हिंदु समाज ग्रासलेला असतांना शासनाकडून राष्ट्र आणि धर्म यांच्या हितार्थ घेतल्या जाणार्‍या निर्णयांना धर्मांध संघटित होऊन कडाडून विरोध करत आहेत. हे असेच चालत राहिले, तर आज बहुसंख्य असलेला हिंदु समाज भारतातच अल्पसंख्यांक होण्यास विलंब लागणार नाही. त्यामुळे हिंदूंना दिशादर्शन करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या दिशेने कृतीप्रवण करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने  देशभर हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन केले जात आहे. मुंबईतील परळ आणि मुलुंड येथे ५ जानेवारीला, तर नवी मुंबईतील तुर्भे येथे ४ जानेवारी आणि वाशी येथे ५ जानेवारी या दिवशी पार पडलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांना धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शंखनाद, वेदमंत्रपठण आणि श्री गणेशाचा श्‍लोक यांनी आरंभ झालेल्या या हिंदु राष्ट्र-जागृती सभांचा समारोप ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु’ या श्‍लोकाने करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती देणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

परळ

हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाका ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आज हलाल अर्थव्यवस्थेच्या नावाखाली इस्लामी राष्ट्रांत साहित्य विक्रीसाठी व्यापारी आस्थापनांना ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही पद्धत आता भारतातही येण्यास आरंभ झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर आक्रमण करणार्‍या हलाल आस्थापनांवर आणि उत्पादनांवर बहिष्कार टाकावा, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी परळ येथील श्री बालाजी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या आवारात पार पडलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले. ते पुढे म्हणाले, ‘‘हलाल अर्थव्यवस्थेतून उभा राहणारा पैसा जगभरातील आतंकवाद्यांना न्यायिक साहाय्य करण्यासाठी वापरला जात आहे, हेही भारतियांनी लक्षात घेतले पाहिजे.’’

या सभेला श्री बालाजी सोसायटीचे अध्यक्ष श्री. सुधाकर कस्तुरी तसेच सचिव श्री. हरिगोविंद गंजी, शिवसेनेचे उपशाखाप्रमुख श्री. गिरीश मत्ते, विश्‍व हिंदु परिषदेचे प्रखंड प्रमुख श्री. विनय ठावरे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता प्रसाद संकपाळ उपस्थित होते.

मुलुंड

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ हिदूंंनी एकवटावे ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली. पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी स्वत:ला इस्लामी राष्ट्र म्हणून घोषित केले. आजमितीला या दोन्ही देशांत हिंदूंचा अनन्वित छळ होत आहे. स्वातंत्र्यानंतर या दोन्ही देशांत हिंदूंची टक्केवारी झपाट्याने घसरली आहे. येथील पीडित अल्पसंख्यांकांना भारतात सामावून घेण्यासाठी भारताने नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीमुळे भारतात अवैधरित्या राहणारे बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या मुसलमान यांना भारताबाहेर हाकलणे शक्य होणार आहे. याचा समस्त राष्ट्रप्रेमी भारतियांना लाभ होणार असल्याने या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ हिंदूंनी एकवटायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी मुलुंड येथील श्री ब्रह्मांडेश्‍वर मंदिरात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला संबोधित करतांना केले.

मुलुंडचे भाजप कोषाध्यक्ष तथा श्री ब्रह्मांडेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्त पंडित पंकज उपाध्याय, विश्‍व हिंदु परिषदेचे माजी संपर्कप्रमुख श्री. रमेश गुप्ता, तसेच धर्मनिष्ठ श्री. रामदास सोनावणे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. पंडित पंकज उपाध्याय हे श्री ब्रह्मांडेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्त आहेत. त्यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले होते. स्वामी समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय माळी यांनी सभेसाठी साहाय्य केले. ‘एस्.टी.व्ही. न्यूज’ आणि ‘व्हॉइस इंडिया वृत्तवाहिनी’चे श्री. निरव जोशी यांनी सभा संपेपर्यंत थांबून संभेचे चित्रीकरण केले, तसेच मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या.

तुर्भे

मंदिरे ही आपली शक्तीस्थाने आहेत ! – चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समिती

मंदिरे ही आपली शक्तीस्थाने आहेत. अनेक पाश्‍चिमात्य पर्यटक आज भारतातील मंदिरांत येऊन तेथील सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेत आहेत. हिंदु संस्कृतीचे (धर्म) महत्त्व समजून घेऊन त्यानुसार कृती करू लागल्याने त्यांचे तणावयुक्त जीवन आता आनंदी झाले आहे. त्यांच्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनात आपली संस्कृती आणि परंपरा यांचे आचरण केले, तर आपले जीवनही आनंदी बनेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी तुर्भे येथील शिवमंदिरात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला संबोधित करतांना केले.

शिवमंदिर प्रतिष्ठानने सभेसाठी ध्वनीक्षेपक, आसंद्या, मंदिराचे सभागृह उपलब्ध करून दिले. शिवसेनेच्या जिल्हा महिला उपसंघटक सौ. निशा पवार आणि ‘ए/ए-१ टाईप अपार्टमेंट ऑनर्स असोसिएशन’चे सचिव श्री. संतोष पवळे यांनी धर्मशिक्षणवर्ग घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले. विघ्नहर्ता आर्टचे श्री. विजय सूर्यवंशी आणि श्री. प्रमोद जयस्वाल यांनी धर्मशिक्षणविषयक हस्तपत्रके छापून देणार असल्याचे या वेळी सांगितले.

वाशी

हिंदु राष्ट्राविषयी देश-विदेशांत होणारे विचारमंथन, ही हिंदु राष्ट्र-जागृती सभांची फलनिष्पत्ती ! – बळवंत पाठक, हिंदु जनजागृती समिती

उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना श्री. बळवंत पाठक

सध्या भारत पालटाच्या वातावरणातून जात आहे. ३७० कलम, नागरिकत्व सुधारणा कायदा ही त्याचीच उदाहरणे आहेत. गेल्या काही मासांपासून ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाची चर्चा राष्ट्रीय विरोधी पक्ष तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि पाकिस्तानातही होत आहे. समितीने आतापर्यंत घेतलेल्या शेकडो हिंदु राष्ट्र-जागृती सभांची ही फलनिष्पत्ती आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी केले. वाशीतील ‘सेक्टर १५’मधील दत्तगुरु अपार्टमेंट येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते.

राष्ट्र, हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात प्रक्षोभक विचार पसरवणार्‍या जेएन्यूतील विद्यार्थी संघटना असोत किंवा मिझोरामसारखी स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणारी राज्ये असोत, यांतून दर्शवली जाणारी धर्मनिरपेक्षता ही फसवणूक असून हिंदूंना या देशात त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

परिसरातील प्रतिष्ठित नागरिक श्री. मुकुंद विश्‍वासराव, व्यापारी श्री. गणेश झोडगे आणि श्री. नितीन जाधव हे या वेळी उपस्थित होते. श्री दत्तगुरु अपार्टमेंट ऑनर्स असोसिएशन, इ २ टाईप ऑनर्स असोसिएशन, कोपरखैरणे येथील माऊली डेकोरेटर्स, मंगेश म्हात्रे ट्रान्सपोर्ट यांनी सभेसाठी मोलाचे सहकार्य केले.

रायगड जिल्ह्यात खरवली (महाड), भोम (उरण), आंबिवली (पनवेल) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

खरवली (महाड) येथील सभेला उपस्थित धर्मप्रेमी

रायगड : देशात सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. कलम ३७० हटवले गेले, रामजन्मभूमी मुक्त झाली, तसेच नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यांविषयी लोकांमध्ये विचारमंथन चालू आहे. काही वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्र शब्द उच्चारणे गुन्हा होता. आज त्या हिंदु राष्ट्राची चर्चा सगळीकडे होत आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी केले. येथील खरवली गावांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ५ जानेवारीला एकवक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वैद्य उदय धुरी यांनी सभेला उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले.

सभेचे सूत्रसंचालन श्री. आल्हाद माळगांवकर यांनी केले. या वेळी रायगड भूषण पुरस्कार प्राप्त ह.भ.प. विठोबा शिंदे यांची वंदनीय उपस्थिती होती. त्यांचा सन्मान हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुदेश पालशेतकर यांनी केला. खरवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वाती विठ्ठल महामुनकर, तसेच गावचे माजी सरपंच श्री. धोंडीराम कळसकर, शिवसेनेचे शाखाप्रमुख श्री. सुरेश कळमकर उपस्थित होते.

विशेष

१. गावचे माजी सरपंच श्री. धोंडीराम कळमकर यांनी सभेच्या प्रचारासाठी सहकार्य केले. त्यांनी २ दिवस समितीच्या कार्यकर्त्यांची गावातील प्रतिष्ठित व्यक्तींशी भेट घडवून आणली.

२. धर्मशिक्षणवर्गातील महिलांनी घरोघरी जाऊन सभेचा प्रसार केला.

आंबिवली (पनवेल)

पनवेल, ८ जानेवारी (वार्ता.) – येथील आंबिवली गावातील श्री दत्त मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ जानेवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली. मंत्रपठणाने सभेला आरंभ झाला. यानंतर ‘राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. मिलिंद पोशे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.

विशेष उपस्थिती – आंबिवली ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. अरुण जळे, श्री. अनंता पाटील, श्री. मीननाथ चौधरी

सभेच्या आयोजनासाठी लाभलेले विशेष सहकार्य

१. श्री दत्त देवस्थान समितीच्या वतीने मंदिराचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले. या वेळी श्री. अनंता पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

२. श्री. वासुदेव गवते यांनी विनामूल्य पाणीव्यवस्था केली.

भोम (उरण)

येथील हनुमान मंदिरात ४ जानेवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली होती. हिंदु जनजागृती समितीच्या डॉ. (सौ.) ममता देसाई यांनी कुलदेवतेच्या नामजपाचे आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाचे महत्त्व सांगितले. तसेच ‘सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रांत होत असलेल्या दुष्प्रवृत्ती रोखण्यासाठी, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे अन् सनदशीर मार्गाने प्रयत्न करायला हवेत, असे मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन श्री. मनीष माळी यांनी केले.

किवळे (तालुका हवेली, जिल्हा पुणे)

जन्महिंदूंनी कर्महिंदु व्हावे ! – हेमंत मणेरीकर, हिंदु जनजागृती समिती

किवळे – लव्ह जिहाद, मंदिरांचे सरकारीकरण, धर्मांतर यांसारख्या हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांना सामोरे जाण्यासाठी हिंदूंनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्मरक्षणासाठी कृतीशील व्हावे. जन्महिंदूंनी कर्महिंदु होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी येथील भैरवनाथ मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये केले. या वेळी १०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या प्रसंगी श्री. मणेरीकर यांनी हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांविषयी विस्तृतरित्या अवगत केले, तसेच हिंदूसंघटन आणि साधना यांचे महत्त्व अधोरेखित केले.

सभेनंतर श्री. हेमंत मणेरीकर यांच्याशी चर्चा करतांना युवक

सभेच्या प्रारंभी शंखनाद आणि वेदमंत्रपठण करण्यात आले. श्री. हेमंत मणेरीकर यांचा सत्कार धर्माभिमानी श्री. गणेश पराडे यांनी केला. सूत्रसंचालन समितीचे श्री. जयेश बोरसे यांनी केले. सभास्थळी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने, तसेच क्रांतिकारकांचे सचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते. किवळे ग्रामस्थांनी श्री भैरवनाथ मंदिराचे सभागृह सभेसाठी उपलब्ध करून दिले.

सभेची सांगता झाल्यावर श्री. मणेरीकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी गावातील युवक मोठ्या संखेने उपस्थित होते. त्यांनी या प्रसंगी धर्मसेवेसाठी वेळ देण्याची भावना व्यक्त केली, तसेच सामाजिक प्रसारमाध्यमांतून धर्मप्रसाराच्या सेवेत सहभागी होण्याचा निर्धार केला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *