हिंदु सेवा परिषद आयोजित सप्तम हिंदु राष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली !
मंडला (मध्यप्रदेश) : भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एन्आरसी) हे कायदे नेमके काय आहेत, हे समजून न घेता विरोध केला जात आहे. जगातील अन्य देशांतही त्यांचा एन्आर्सी कायदा आहे. एन्आरसी आणि नागरिकत्व यांविषयी सक्षम कायदे असणे, हे कोणत्याही देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सीएए आणि एन्आरसी यांच्यामुळे भारतातील अल्पसंख्यांकांचे नागरिकत्व धोक्यात येणार नाही. असे असतांनाही काही समाजविघातक घटकांकडून या कायद्यांना जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. वास्तविक काँग्रेस सरकारने त्यांच्या सत्ताकाळात नागरिकत्व सुधारणा विधेयक सर्वप्रथम संसदेत ठेवले होते; पण आज तोच काँग्रेस पक्ष याला विरोध करत आहे. एन्आर्सी आणि सीएए यांच्यामुळे भारतात घुसखोरी केलेल्यांना देश सोडावा लागेल, तसेच पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्यांक हिंदूंना भारतात वास्तव्य मिळेल, त्यामुळे हे दोन्ही कायदे भारतासाठी आवश्यक आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु सेवा परिषदेने २७ आणि २८ डिसेंबर २०१९ या दोन दिवशी ‘सप्तम हिंदु राष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन केले होते. त्या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी वरील मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे आयोजन येथील तुलसी तपोवन गौशाला येथे करण्यात आले होते.
हिंदु सेवा परिषदेच्या कार्यकर्त्यांना ‘हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ याविषयी माहिती मिळावी, तसेच त्यांना स्वधर्माचे शिक्षण मिळून हिंदु राष्ट्रासाठी आदर्श कार्यकर्ते निर्माण व्हावेत, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ‘धर्मशिक्षणाची आवश्यकता, जीवनात साधनेची आवश्यकता, नियोजनपूर्ण समष्टी साधना कशी करावी ?, राष्ट्र आणि धर्म यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत परिषदेचे जबलपूर, मंडला आणि निवास या जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यशाळेत हिंदु सेवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी, प्रदेश उपाध्यक्ष श्री.जीतेंद्र चिमनानी, मंडला जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष कच्छवाह, प्रदेश महासचिव श्री. धर्मेंद्र ठाकूर आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी मार्गदर्शन केले.