सार्वजनिक मालमत्तेची हानी करून कायद्याला विरोध करणे, हे देशविघातक कार्य करण्याचे मोठे षड्यंत्र ! – नीलेश टवलारे, हिंदु जनजागृती समिती, अमरावती
अमरावती : नागरिकत्व सुधारणा कायद्याचा पूर्ण अभ्यास न करता याविषयी सर्वसामान्यांची दिशाभूल केली जात आहे. सार्वजनिक मालमत्तेची हानी करून, तसेच सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस यांना मारहाण करून कायद्याला विरोध करणे, हेे देशविघातक कार्य करण्याचे मोठे षड्यंत्रच आहे. घटनाविरोधी पद्धतीने कायद्याला विरोध करणे, हे अयोग्य असून संबंधितांवर कारवाई व्हायला हवी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी केले.
चांदूर बाजार तालुक्यात ८ जानेवारी या दिवशी राष्ट्रप्रेमींकडून केंद्रशासनाच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य फेरी काढण्यात आली. यामध्ये या कायद्याविषयी विस्तृत माहिती देण्यासाठी मुख्य वक्ता म्हणून हिंदु जनजागृती समितीला निमंत्रण देण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर संंघचालक प्रा. ब्रह्मानंद तिवारी, नगराध्यक्ष श्री. रवींद्र पवार, पंचायत समिती उपसभापती श्री. नितीन टाकरखेडे, पंचायत समिती अध्यक्ष श्री. ब्रिजमोहन हरकुट, श्री. आनंद अहिर, श्री. मुरली माकोडे आदी मान्यवर उपस्थित होते. अ.भा.वि.प. चे श्री. चेतन खडसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
क्षणचित्रे
१. पावसाचे वातावरण असूनही फेरीमध्ये सहस्रोंच्या संख्येने राष्ट्रप्रेमी सहभागी झाले.
२. ‘समितीने मांडलेला विषय अभ्यासपूर्ण आणि महत्त्वपूर्ण होता’, असे मत कार्यक्रमानंतर अन्य मान्यवरांनी व्यक्त केले.
३. फेरीमध्ये या वेळी ३०० फूट लांबीचा राष्ट्रध्वज धरण्यात आला.